पुणे, ३१ जुलै २०२५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) चार प्राथमिक टीपी स्कीम (नगररचना योजना) अखेर शासनाकडून मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पुणे महानगर परिसरातील नियोजनबद्ध विकासाला गती मिळणार असून, रिंगरोड सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठीही मार्ग मोकळा झाला आहे.
शासनाने मंजुरी दिलेल्या चार टीपी स्कीममध्ये वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडी आणि होळकरवाडीतील दोन योजना यांचा समावेश आहे. याशिवाय पुणे महापालिकेच्या हद्दीतील फुरसुंगी येथील योजनाही या यादीत आहे. या स्कीममुळे सुमारे ६.८ किलोमीटर लांबीचा रिंगरोड विकसित केला जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना आणि पुढील नियोजनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.
विकासासाठी गावनिहाय संवाद व नियोजन
योजना अंमलबजावणीच्या टप्प्यावर येत असताना PMRDAने नव्याने प्रस्तावित १५ नगररचना योजनांसाठीही जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द १, २, ३, वडकी (ता. हवेली), माण (मुळशी), धामणे, गोदुंबरे, दारुंबरे/साळुंब्रे १ व २, सांगवडे (ता. मावळ), नेरे आणि बावधन बु. (ता. मुळशी) या गावांचा समावेश आहे.
या योजनेतील रस्ते, नागरी सुविधा व विकास आराखड्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून आराखडे निश्चित करण्यात येणार आहेत. गावनिहाय बैठका आयोजित करून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले जाणार आहे.
“टीपी स्कीमला मंजुरी मिळाल्यामुळे विकास प्रक्रियेला गती येईल. नव्या १५ योजनांसाठी स्थानिक प्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार करूनच अंतिम आराखडे ठरवले जातील,” असे पीएमआरडीए, महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार