September 11, 2025

राज्यातील मागासवर्गीय गृहरचना संस्थांच्या बाबतीत सरकार “विशेष धोरण” ठरविणार – अण्णा बनसोडे

पुणे, १३/०८/२०२५: पुणे शहरातील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी तसेच अहिल्या, करूणा, पर्णकुटी सोसायटी यांच्यासह राज्यभरातील मागासवर्गीय गृहरचना संस्थांचे समाज कल्याण विभागाकडील प्रलंबित “निरंक” प्रमाणपत्र मिळणे बाबत तसेच इतर महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भात निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे “विशेष बैठक” आयोजित केली होती.

या बैठकीला निर्भय प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष निखिल गायकवाड,संचालक डॉ. पवन सोनवणे यांच्यासह समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ- मुंडे तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे, सचिव विलास कांबळे, डॉ. सुनिल धिवार, अहिल्या सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप ढिवाळ उपस्थित होते. समाज कल्याण विभागाकडील या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात एक महिन्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभा उपाध्यक्षांनी यावेळी दिले.

या महत्वपूर्ण विषयावर सोसायट्यांचे प्रतिनिधी व अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्वच मागासवर्गीय गृह रचना संस्थांचे प्रलंबित प्रश्न निकाली लावण्याबाबत राज्य शासनाकडून तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती यावेळी विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिली.