पदवी प्रवेशाची सीईटी होणार विनाशुल्क, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जुलैअखेर सीईटी

पुणे, ५/०६/२०२१: करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बारावी परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिल्यादांच विनाशुल्क सीईटी घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलैअखेर सीईटी होणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधत शैक्षणिक संबंधित निर्णयाची माहिती दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी सीईटी घेतली जाते. सीईटीसंदर्भात कालच बैठक झाली. त्यात अभियांत्रिकी, फार्मसीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटी जुलैअखेर अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यंदा सीईटीसाठी परीक्षा केंद्र दुपटीने वाढविण्यात येणार आहे.

यंदा बारावी परीक्ष रद्द झाल्याने बीए, बीकॉम, बीएसस्सी यासारख्या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया कसे होतील, या प्रश्‍नांवर उदय सामंत म्हणाले, या प्रवेशासाठी शिक्षणतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. या पदवीच्या प्रवेशासाठी वेगळा विचार करीत त्यांच्यासाठी सीईटी घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सीईटीचा निर्णय घेण्यात येणार आहे. सीईटी घेण्याचा निर्णय झाल्यास ती कोणत्याही शुल्काशिवाय घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले