दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली, 3 जून 2021:  दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करायला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज मंजूरी दिली.

डिजिटल/ऑनलाईन/ऑन-एअर शिक्षणासंबंधित सर्व प्रयत्नांच्या एकत्रीकरणासाठी पीएम-इ-विद्या हा सर्वसमावेशक उपक्रम 17 मे 2020 रोजी सुरु करण्यात आला. दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता हा विशेष कार्यक्रम राबवला जात आहे. या दृष्टीकोनातून शिक्षण मंत्रालयाच्या साक्षरता आणि शालेय शिक्षण विभागाने या बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याबाबत शिफारस करण्याकरता तज्ञांची एक समिती स्थापन केली होती.

दिव्यांग (CwDs) आणि विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांसाठीसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरुन सर्वसमावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होईल. समितीने 11 कलमे आणि 2 परिशिष्ट असलेला “दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता मार्गदर्शक सूचना” या शीर्षकाचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल सामायिक करण्यात आला, सादर झाला तसंच त्यावर चर्चाही झाली. शिक्षण मंत्रालयाने हा अहवाल स्विकारला आहे.

अहवालातील इ-साहित्य मार्गदर्शक सूचनांची ठळक वैशिष्ट्य याप्रमाणे :

आकलन होईल असे, प्रयोगशील, समजण्यायोग्य आणि मजबूत या चार आधारांवर दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित केले पाहिजे.

लिखित साहित्य, सारणी, आकृत्या, दृश्ये, ध्वनी, चलचित्रे इत्यादींचा समावेश असलेल्या इ-साहित्याने राष्ट्रीय मानक (GIGW 2.0) आणि आंतरराष्ट्रीय मानक WCAG 2.1, E-Pub, DAISY इत्यादी) यांच्या सुलभतेच्या मानकांचे पालन केले पाहिजे.

साहित्य प्रसारित होते असेव्यासपीठ (उदा. दिक्षा) आणि साहित्य उपलब्ध होते, संवाद साधता येतो असे वाचन व्यासपीठ/उपकरणे (उदा. इ-पाठशाला) यांनी तांत्रिक दर्जा राखला पाहिजे.

या बालकांच्या विशेष गरजा पूर्ण होण्यासाठी योग्य शैक्षणिक वसतिगृहाची शिफारस केली आहे.

तांत्रिक मानके आणि मार्गदर्शक सूचनांबाबत अहवालाच्या चोथ्या भागात तपशीलवार माहिती दिली आहे.

पुस्तके टप्प्याटप्प्याने सहज उपलब्ध होतील अशा डिजिटल स्वरूपात रुपांतरीत करण्याची शिफारसही समितीने केली आहे. डिजिटल पुस्तकातील साहित्य विविध माध्यमात उपलब्ध करावे (लेखी, ध्वनी, चलचित्रे, सांकेतिक भाषा इत्यादि). यात माध्यम निवडण्याची, ती सुरु-बंद करण्याची सुविधाही असावी. दिव्यांग बालकांना या साहित्य आणि त्यातील सरावाच्या भागाला विविध प्रकारे प्रतिसाद देता यावा अशी लवचिकता डिजिटल पुस्तकात असावी.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनुभवासह, नजीकच्या एनसीइआरटी मापदंड विकसित करण्याच्या अनुभवासह, डिजिटल पुस्तके विकसित करण्याबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना:  बरखा: सगळ्यांसाठी वाचनमालिका (मुद्रीत आणि डिजिटल माध्यम), सगळ्यांसाठी सुलभ पाठ्यपुस्तक आणि युनिसेफचे शिक्षणासाठी वैश्विक पातळीवर तयार केलेले डिजिटल पाठ्यपुस्तक (दिव्यांग असलेल्या आणि नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी) पाचव्या भागात सादर केले आहे.

डिजिटल पुस्तकासह, भाग 6 ते 9 पुरवणी इ-साहित्य विकसित करण्याबाबत विशेष मार्गदर्शक सूचनांची शिफारस समितीने केली आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या आरपी डब्ल्यूडी कायदा 2016 मधे 21 दिव्यांग प्रकारांचा नेमका उल्लेख केला आहे. यानुसार वैचारिक आणि विकासाबाबतचे व्यंग, बहुव्यंगता, ऑटिझम स्पेक्ट्रम आजार, श्रवण दोष, अंधत्व, अधू दृष्टी, बहिरेपण आणि ऐकण्यात त्रास तसेच इतर गोष्टींचा समावेश आहे.

शिफारशींचा सार भाग दहा मधे सादर केला आहे जेणेकरुन साहित्य तयार करणारे, त्याची रुपरेषा तयार करणारे, विकसित करणारे यांच्याबरोबर तो मोठ्या प्रमाणावर सामायिक करता येईल.

पथदर्शी आराखड्याची सक्षम आणि शिस्तबद्ध अंलबजावणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती अहवालाच्या 11 व्या भागात दिली आहे.

सांकेतिक भाषेच्या चलचित्रे निर्माणासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना आणि तांत्रिक मानके अहवालाच्या परिशिष्ट एक मधे दिली आहेत.

शिकण्याबाबतच्या वैश्विक आराखड्याच्या ( UDL) साहित्य विकसित करणे आणि शैक्षणीक वसतीगृहासंदर्भात अहवालाच्या परिशिष्ट दोन मधे माहिती दिली आहे.

दिव्यांग बालकांसाठीच्या डिजिटल शिक्षणासाठी उच्च दर्जाचे साहित्य विकसित करण्याकरता या मार्गदर्शक सूचना महत्वाचे पाऊल आहे. अनुभवावर आधारित सुधारणा करणे आणि नव्या तंत्रज्ञानांचा स्विकार करण्याची जबरदस्त क्षमता मूळातच त्यांच्यात असते .

मार्गदर्शक सूचना जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.