पुणे, ११/१२/२०२३ – महाराष्ट्र हा संतांचा देश आहे. लोकसेवेचे महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारले. त्याचा पाया उभारण्याचे महत्त्वाचे काम संत ज्ञानेश्वरांनी केले. तसेच ज्ञानेश्वारांनी सामान्यांना कळेल अश्या भाषेत गीता ओव्या लिहून समाज प्रबोधनाचे काम केले, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ, सुरेश गोसावी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यातिथी आणि संजिवन समाधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, या कार्यक्रमाचे व्याख्याते आणि संत ज्ञानदेव अध्यासनाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार, रासेयो संचालक डॉ. सदानंद भोसले, संत तुकाराम महाराज अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ. अभय टिळक, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
माऊलीने आपल्याला काय दिले? तर माऊलीने आपल्याला माणूसपणाची जाणीव करून दिली, जी आजच्या काळात खुप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे व्याख्याते आणि संत ज्ञानदेव अध्यासनाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांनी केले. तर आज आपण मराठी ही अभिजात भाषा व्हावी म्हणून जो संघर्ष करतोय, त्यासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेप्रतीचा जो अभिमान लागतो, तो संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।’ या ओवीतून दिला, असेही ते यावेळी म्हणाले. तर जसे प्रत्येक घरी संविधानाची प्रत हवी तसेच प्रत्येक घरी ज्ञानेश्वरी, संत वाङ्मय असावे असे मत रासेयो संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरूवात ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना गाऊन केली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती करून त्यांची पुजा करण्यात करण्यात आली. तसेच पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन