जीवे मारण्याची धमकी देउन पत्र पाठवून मागितली २० लाखाची खंडणी

पुणे, दि. ४ जून २०२१: स्वारगेट परिसरातील एका बँक मॅनेजरच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी तरूणाला पत्र पाठवून मारण्याची धमकी देत २० लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड परिसरातील एका ४२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरूणाने काही दिवसांपुर्वी एका बँक मॅनेजरच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, चौकशीअंती काही समोर न आल्याने तो अर्ज फाईल करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादींना एक निनावी पत्र आले. त्यामध्ये संबंधीत बँक मॅनेजरच्या विरोधात दाखल असलेली तक्रार पाठीमागे घे, माझ्या बँक खात्यावर आनलाईन २० लाख रुपये जमा कर, नाहीतर तुला व तुझ्या परिवाराला जीवे ठार मारुन टाकेल अशी धमकी दिली आहे. त्यानंतर फिर्यादींनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले होते.