‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ जगातील सर्वात गुंतागुंतीचे आणि न सुटणारे कोडे – तुकाराम मुंढे

पुणे, ९ डिसेंबर २०२२ :“आज डॉकटरकडे गेले की पहिले ‘चाचणी करा’ असे सांगितले जाते. पैसा, मोठी रुग्णालये, कॉर्पोरेट क्षेत्र यामुळे आरोग्य क्षेत्रात बरेच बदल झालेत. जीवनशैलीबाबत आपल्या सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ हे जगातील सर्वात गुंतागुंतीचे आणि न सुटणारे कोडे बनले असून, ते सोडविणे अतिशय अवघड आहे,’’ असे मत प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. यावेळच्या भाषणात व्यक्त करण्यात आलेली मते, ही आपली वैयक्तिक मते असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

पी.एम.शाह फाउंडेशनच्यावतीने ११ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ व १० डिसेंबर दरम्यान विधी महाविद्यालय रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अरुण गद्रे, पी एम शहा फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण कोठडीया, विश्वस्त डॉ.विक्रम काळुस्कर, फाउंडेशनचे संचालक अ‍ॅड.चेतन गांधी, सतीश कोंढाळकर आणि एनएफडीसी-एनएफएआयचे व्यवस्थापक जसबीर सिंग हे उपस्थित होते. ‘रेखा’ या त्वचेची स्वच्छ्ता या विषयावर आधारित लघुपटाद्वारे महोत्सवाची सुरवात झाली.

मुंढे म्हणाले, “आज आरोग्य सुविधा वाढल्या आहेत, तंत्रज्ञानाचा वापरही वाढला आहे. हल्ली आपले आरोग्य कसे असायला हवे, हे आपण स्मार्ट वॉच’कडून जाणून घेतो, तर आरोग्याच्या समस्येबाबत गुगल डॉकटरकडून उपाय केले जाते. हे अतिशय दुर्दैवी आहेत. कारण हे तंत्रज्ञान केवळ तुम्हाला हवे, तेच सांगते. अशा तंत्रज्ञानामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. आर्टीफिशल इंटेलिजन्सचा वापर नक्कीच करा. पण आर्टीफिशल जीवन जगू नका.’’

सुदृढ जीवनशैलीबाबत मुंढे म्हणाले, “ जीवनशैलींचे आजार ही आजच्या काळातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. आपल्यापैकी अनेक जण मधुमेह ते उच्च रक्तदाब अशा विविध प्रकारच्या आजारांनी त्रस्त आहेत. आपल्या आरोग्यासाठी आपण पुरेसा वेळ देत नाही. थोडा वेळ स्वत:साठी द्यायला सुरवात केली. तर जीवनात महत्वाचा बदल होईल. त्याचबरोबर आपल्याला आपली विचारपद्धती आणि आहार पद्धती बदलली पाहिजे. त्याबाबत केवळ बोलून नाही, तर कृती करणेही गरजेचेच आहे.’’

आहारातील बदलाबाबत मुंढे म्हणाले, “आपले निसर्ग शास्त्र हे खूप प्रगत आहे. त्याला आपण समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे प्रत्येक भागात तेथील भौगोलिक स्थितीच्या विचारातूनच अन्न उत्पादित होते. थंड प्रदेशात तेथील वातावरणाला अनुकूल, तर उष्ण प्रदेशात तेथील वातावरणाला अनुकूल कृषी उत्पादन होते. त्यामुळे स्थानिक आणि ऋतुमानानुसार योग्य अशा अन्न धान्यांचा आहारात अधिक समावेश असला पाहिजे.’’

डॉ. गद्रे म्हणाले, “ प्रत्येक माध्यम काहीतरी सांगत असते, त्याचप्रमाणे सिनेमा देखील काहीतरी सांगत असतो. चित्रपट हा एक संवाद आहे, या महोत्सवातील चित्रपट हा तर आरोग्य संवाद आहे. माणूस हा ‘व्हिज्यूअल’ माध्यमातून अधिक शिकत असतो. त्यादृष्टीने सिनेमा आणि हा महोत्सव अतिशय महत्त्वाचा ठरतो. या महोत्सवाच्या माध्यमातून व्यसन, पोर्नोग्राफी, तरुणांमधील नैराश्य अशा सध्याच्या काळातील ज्वलंत विषयांवर भर देण्यात यावा. त्याचबरोबर आरोग्याबाबत जनजागृतीसाठी लघु स्वरूपातील दृकश्राव्य माहिती तयार करून ती व्हाटस अप’च्या माध्यमातून दिली जावी आणि अशा प्रकारच्या कंटेटसाठी महोत्सवात एक वेगळा विभाग असावा. ’’

कार्यक्रमात चित्रपट महोत्सवाच्या निवड व परीक्षण समितीचे सदस्य चित्रपट निर्माते विनय जवळगीकर,शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या अनुजा देवधर आरोग्यसुविधा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. लीना बोरुडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले, तर अ‍ॅड चेतन गांधी यांनी प्रास्ताविक केले.