‘हिजाब गर्ल कमिंग इन पुणे’: प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी मुस्कान खान रविवारी पुण्यात

पुणे, ०४/११/२०२२: कोंढव्यातील अहद फाऊंडेशन ने आयोजित केलेल्या ‘महंमद सबके लिए’ या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी ‘हिजाब गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या मुस्कान खान(कर्नाटक) या रविवारी पुण्यात येत आहेत. अहद फाउंडेशन चे अध्यक्ष मज़हर मणियार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार आणि खासदार एड.वंदना चव्हाण,इस्लामचे अभ्यासक मौलाना रशीद मिफ्ताही हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हजरत महंमद पैगंबर यांच्या जीवनकार्याविषयी प्रश्न या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विचारण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुस्कान खान प्रथमच पुण्यात येत आहेत.

रविवार,दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी कोंढव्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (कोंढवा पोलीस स्टेशन समोर) येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.अहद फाउंडेशन ने ‘महंमद सबके लिए’ ही प्रश्नमंजुषा स्पर्धा सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी घेतली होती. एक महिनाभर चाललेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेत १० हजार जण सहभागी झाले होते.

मक्का-मदिना (उमराह) यात्रा हे पहिले पारितोषिक असून इलेक्ट्रिक स्कुटर,लॅपटॉप,डेस्कटॉप कॉम्प्युटर,सायकल,घड्याळे,स्मार्ट बँड अशी पारितोषिके या कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. रविवारी होणाऱ्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी ५ हजार जण उपस्थित राहतील असा अंदाज आहे.