प्रवाशांना बनावट करोना निगेटिव्ह प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या व्यक्तींना हिंजवडी पोलीसांकडून अटक

पुणे, दि. 20 एप्रिल 2021: नागरिकांना प्रवासासाठी बनावट करोना निगेटिव्ह प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या दोन व्यक्तींना हिंजवडी पोलीसांनी मंगळवारी (दि.२०) अटक केली आहे. याप्रकरणी अटक झालेल्या व्यक्तींची नावे राकेशकुमार बस्तीराम वैष्णव, वय २५ वर्षे, (रा. धनकवडी) आणि पत्ताराम केसारामजी देवासी, वय ३३ वर्षे, (भुमकरवस्ती, वाकड) अशी आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांना बातमीदाराकडून हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शनी मंदिर इंदिरा कॉलेज येथे दोन व्यक्ती हे प्रवाशांना प्रवासाकरीता बनावट प्रमाणपत्र १०० ते ५०० रुपयात लगेच देत आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, तपास पथकाचे अधिकारी त्या ठिकाणी गेले. त्यापैकी एका व्यक्तीस ५०० रुपये देऊन प्रमाणपत्राची मागणी केली. ती व्यक्ती पैसे घेऊन गेला आणि ९५ मिनिटांनी करोना निगेटिव्ह प्रमाणपत्र घेऊन परतला. मात्र हे प्रमाणपत्र व्हॉट्सअपवर पीडीएफ फाईल स्वरूपात होते. पोलीसांनी प्रमापत्र बनविणाऱ्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांचा मोबाईल तपासलयानंतर मोबाईलमध्ये व्हॉस्टअपवर काही करोना निगटिव्हचे बनावट रिपोर्ट असलेली पीडीएफ फाईल मिळाली. अटक आरोपींकडून दोन मोबाईल फोन, ३०००/- रुपये रोख |कोरोना निगेटिव्हचे एकुण २८ बनावट प्रमाणपत्र असे एकुण ३०,०००/- किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. आरोपींनी हे प्रमाणपत्र राजु भाटी (रा.वाकड) या व्यक्तीने बनवून दिले असल्याचे सांगितले. हे रिपोर्ट बावधन येथील लाईफनिटी वेलनेस इन्टरनॅशनल लिमीटेड या नावाने असल्याने पोलीसांनी सबंधित प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्याबाबत चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध साथरोग अधिनियम १८९७ च्या कलम ३नुसार तसेच महा.कोव्हीड ९१९ उपाय योजना २०२० च्या कलम ९९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पिपंरी चिचंवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर ‘पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्‍त गुन्हे सुधीर हिरेमठ,परिमंडळ दोनचे पोलीस उप-आयुकक्‍त आनंद भोईटे, वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम, यशवंत सांळुके, पोलीस अंमलदार बंडू मारणे,महेश वायबसे, किरण पवार, बाळकृष्ण शिंदे, नितीन पराळे,कुणाल शिंदे, शिवराम भोपे, चंद्रकात गडदे, कारभारी पालवे, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, सुभाष गुरवा दत्तात्रय शिंदे, झनक गुमलाडु, नुतन कोडे यांच्या पथकाने केलेली आहे.