September 12, 2025

पशुसंवर्धन विभागात समुपदेशनाद्वारे बदल्यांचा ऐतिहासिक निर्णय; राज्यभरात मनुष्यबळाचा समतोल साधण्याचा प्रयत्न

पुणे, १४ मे २०२५ : राज्यातील पशुवैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा नवा अध्याय सुरू करत पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया प्रथमच समुपदेशनाच्या माध्यमातून राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने पशुधन विकास अधिकारी (गट-अ) आणि सहाय्यक आयुक्त (गट-अ) संवर्गातील बदल्या समुपदेशन पद्धतीने करण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे केवळ बदल्यांची प्रक्रिया खुली आणि पारदर्शक होणार नाही, तर राज्यभरात मानवसंपदेचा संतुलित वापर होऊन पशुवैद्यकीय सेवा अधिक प्रभावी बनणार आहेत. अधिकाऱ्यांच्या कौशल्य आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन त्यांच्या पसंतीनुसार नियुक्ती दिली जाणार आहे, ज्यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

ही समुपदेशन प्रक्रिया १५ आणि १६ मे २०२५ रोजी पुणे येथील आयुक्त, पशुसंवर्धन कार्यालयात पार पडणार असून सुमारे ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांना विविध पदांच्या पर्यायांमधून निवड करण्याची संधी मिळणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे.

दरम्यान, विभागाची अलीकडील पुनर्रचना आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदांसाठीही समुपदेशन पद्धतीनेच भरती केली जाणार आहे. या निर्णयामुळे विभागीय कार्यात नवचैतन्य निर्माण होणार असून, अधिकाऱ्यांना समान संधी आणि न्याय्य वागणूक मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “बदलांची ही पद्धत पारदर्शकतेला चालना देणारी असून, अधिकाऱ्यांना योग्य न्याय आणि संधी देणारी आहे. प्रशासनातील कार्यक्षमता आणि ग्रामीण भागांतील पशुपालकांपर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवण्याचा आमचा उद्देश या प्रक्रियेमुळे साध्य होणार आहे.”
हा निर्णय विभागाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि इतर प्रशासकीय विभागांसाठीही दिशादर्शक ठरेल, असे उपायुक्त डॉ. प्रशांत भड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.