पुणे: हनीट्रॅपमध्ये अडवून खंडणी उकळणाऱ्या टोळीने केली अनेकांची फसवणूक
जिल्ह्यातील सात ते आठ जणांना लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस

पुणे, दि. २०/०८/२०२१: सोशल मिडीयावरून नागरिकांना जाळ्यात ओढून हनी ट्रॅपद्वारे ग्रामीण भागातील सात ते आठ जणांकडून खंडणी स्वरूपात लाखो रूपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील उरळी कांचन परिसरातील एका व्यवसायिकाकडून २० लाख रूपये उकळल्याचे समोर आले आहे.

कोंढवा पोलिसांनी रवींद्र भगवान बदर (वय २६, रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा. येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय ४०, रा. गोकुळनगर, कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय ३२, रा. बाणेर, मूळ- माढा, सोलापूर), मंथन शिवाजी पवार (वय २४, रा. इंदापूर), आणि १९ वर्षीय तरुणी यांना अटक केली होती.

पनवेल येथील बांधकाम व्यवसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या टोळीतील सहा जणांस कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. टोळीतील १९ वर्षीय तरुणीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यवसायिकासोबत ओळख निर्माण केली. त्यांना येवलेवाडी परिसरात बोलवून संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्या साथीदारांना बोलवून घेतले. व्यवसायिकाला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच लाख रूपयांची खंडणी मागितली होती. या टोळीने त्यांना त्रास देण्यास सुरूवात केल्यानंतर व्यवसायिकाने सुरूवातीला कुटुंबियांना विश्वासात घेतले. झालेला प्रकार सांगून पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर तरुणीकडे चौकशी केल्यानंतर ती अनेकांसोबत संपर्कात असल्याचे आढळून आले होते. तिने पुणे ग्रामीण परिसरातील सहा ते सात नागरिकांना अशाच पध्दतीने जाळ्यात ओढळून लाखो रूपये खंडणीस्वरुपात उकळल्याचे समोर आले आहे. पण, बदनामीच्या भितीने कोणी तक्रार देण्यास पुढे आलेले नाही.

कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून टोळीला पकडल्यानंतर व्यवसायिकाने लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुणीने व्यवसायिकाशी इन्स्टाग्रामवरून ओळख केली. त्यानंतर त्यांना लोणीकाळभोर परिसरात भेटण्यास बोलविले. त्या ठिकाणी व्यवसायिकासोबत तरुणीने जबरदस्तीने संबंध ठेवले. त्यानंतर साथीदारांना बोलवून घेतले. तक्रारदार यांना यवत पोलिस ठाण्यासमोर घेऊन गेले. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ५० लाख रूपयांची खंडणीची मागणी केली. शेवटी तडजोड म्हणून २० लाख रूपये त्यांच्याकडून घेतले. त्यानुसार १९ वर्षाच्या तरुणीसह तौसिफ शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, ऋतुराज कांचन, बंटी आमले, प्रतिक लांडगे व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.