अनिल धनवटे
पुणे, १४/१२/२०२५: शहरात सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला रविवारी सुट्टीचा दिवस साधत पुस्तकप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच विविध वयोगटातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरात अत्यंत उत्साही आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.
या महोत्सवात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोक सहभागी झाले होते. विशेषतः लहान मुलं उत्साहाने पुस्तके पाहताना, वाचताना आणि खरेदी करताना दिसून आली. पालकांनीही आपल्या मुलांसह आवर्जून उपस्थिती लावली होती. लहान मुलांसाठी असलेला ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. येथे कथाकथन, चित्रकला, सामूहिक लेखन, तसेच रंगीबेरंगी बाहुल्यांचे खेळ अशा विविध उपक्रमांत मुलांनी आनंद लुटला. काही ठिकाणी मुलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
यंदाच्या पुस्तक महोत्सवात ८०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते. बालसाहित्य, शैक्षणिक पुस्तके, कथा, कादंबऱ्या यांसह विविध विषयांवरील पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळाला. वाचकांसाठी अनेक स्टॉलवर आकर्षक सवलतीही देण्यात आल्या होत्या. तसेच ‘वंदे मातरम्’ या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणागीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित आनंदमठ या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले.
महोत्सवाला भेट देणारे संजय भागवत यांनी सांगितले की, “पुण्याला अशा प्रकारच्या महोत्सवाची नितांत गरज होती. यामुळे विचारांची समृद्धी होते, संवाद साधण्याची संधी मिळते आणि अनेक नामवंत लेखक व विचारवंतांना पाहता व ऐकता येते. या महोत्सवातून आम्हाला खूप काही पाहायला आणि शिकायला मिळाले.”
महोत्सवात आलेला सहा वर्षीय तिर्थ देवधर म्हणाला, “इथे येऊन मी आणि दिदीने खूप धम्माल केली. चिल्ड्रन्स कॉर्नरमध्ये अनेक खेळ खेळलो. त्यात ए.बी.सी.डी.चा खेळ मला खूप आवडला.”
एकूणच पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून वाचनसंस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम सर्वांसाठीच आनंददायी ठरला.

More Stories
फर्ग्युसन महाविद्यालय येथे १३ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन
जुन्नर वन विभागात 68 बिबटे जेरबंद; पिंजरे व समन्वित उपाययोजनांचा मोठा फायदा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
बनावट वेबसाइट्स,अॅप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन