पुणे, ३ जून २०२५ः पुण्यातील सिझन मॉलमध्ये नुकतेच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी अभिनेता अक्षय कुमार आणि इतर कलाकार आले असता प्रचंड गर्दी उसळली. कलाकारांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत क्षण अनुभवण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी संपूर्ण मॉल परिसरात एकच गर्दी केली. काही वेळातच परिस्थिती इतकी बिघडली की मॉलमधून बाहेर पडणं नागरिकांसाठी कठीण होऊन बसलं.
या गर्दीत लहान मुलं, महिला आणि वयोवृद्ध देखील अडकले. धावपळ आणि गोंधळ यामुळे काही ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी स्थितीही निर्माण झाली. यावेळी अक्षय कुमारने स्वतः पुढे येत शांततेचं आवाहन केलं. “लहान मुलं आणि महिला इथे उपस्थित आहेत. कृपया धक्काबुक्की करू नका,” अशा शब्दांत त्याने जमलेल्या चाहत्यांना संयम बाळगण्याचं सांगितलं.
गर्दी आणि गोंधळामुळे कार्यक्रमाचं आयोजन, सुरक्षेचं नियोजन आणि पोलिसांची भूमिका यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे अपेक्षित असतानाही पोलिसांनी योग्य नियोजन केलं नव्हतं का?, एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमवण्याची परवानगी दिली कशी? – असे सवाल उपस्थित होत आहेत.
सुरुवातीस सुरक्षेचा अभाव जाणवला असला तरी परिस्थिती बिघडत चालल्याचं लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागवला आणि गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर, सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांचे आयोजन करताना कडक सुरक्षा उपाययोजना आणि यथायोग्य नियोजन करणं किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार