पुणे, २४ डिसेंबर २०२५ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा तसेच शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुणे महापालिका भवनातील हिरवळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट आणि ठाम शब्दांत मांडली. कोणताही राग, लोभ किंवा दबाव न ठेवता, सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
१९९९ मध्ये हजारो कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची आठवण करून देत जगताप म्हणाले, “२६ वर्षे पक्षात काम करण्याची संधी मिळाली. अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करता आले. नगरसेवक, महापौर, शहराध्यक्ष अशी प्रत्येक संधी पक्षामुळेच मिळाली. वानवडीतील नागरिकांनी मला भरभरून आशीर्वाद दिला. यासाठी सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मी कायम ऋणी राहीन.”
“मी राजकारणात केवळ पदासाठी आलो नाही. विजय-पराजयाची भीती मला नाही. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी पवार साहेबांचा उमेदवार म्हणून लाखाच्या पुढे मते मिळाली, हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मागील काही दिवसांत अनेक वावड्या उठल्या, निर्णयाबाबत घालमेल सुरू होती. आरोग्यावर परिणाम होऊ न देता, सर्वांचा आदर राखून पक्षाचा आणि शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे. हा निर्णय कोणालाही धक्का देण्यासाठी नाही,” असेही त्यांनी सांगितले.
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर बोलताना जगताप म्हणाले, “मी गुपचूप भाजपमध्ये गेलेलो नाही. सर्वांना सांगूनच हा निर्णय घेतला आहे. शरद पवार साहेबांबद्दल माझा आदर कायम आहे आणि राहील. सामाजिक प्रश्नांसाठी भविष्यातही त्यांच्याकडे जाणार आहे.”
पक्ष कार्यालयावर आपला कोणताही दावा नसल्याचे स्पष्ट करत, पक्षावर टीका करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. “सुळे मॅडम आणि शिंदे यांनी मला चर्चेसाठी वेळ दिला, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. नेत्यांशी झालेल्या चर्चेची कुठेही वाच्यता करणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.
“शतकात एक नेता शरद पवारांसारखा जन्माला येतो. त्यांच्या सामाजिक ऐक्याच्या भूमिकेशी मी जोडलेलो होतो. हा निर्णय पक्ष नेतृत्वाच्या विरोधात नाही. पुण्यात १.२७ लाख नागरिकांनी एका विचाराच्या विरोधात मतदान केले आहे; त्यांच्या मतांचा अवमान करण्याचा माझा उद्देश नाही,” असे जगताप म्हणाले.
भविष्यातील भूमिकेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, “मी पुणेकरांच्या प्रश्नांसाठी लढत राहणार आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूक मी नक्की लढवणार आहे.”
तसेच, “माझ्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडू नये,” असे आवाहन करत त्यांनी पत्रकार परिषद संपवली.

More Stories
Pune: बाणेर-बालेवाडीत पवारांचा डाव; मुरकुटेंच्या भेटीने राजकीय खळबळ
जगतापांचा राजीनामा पण दोन्ही राष्ट्रवादीसह मविआची बैठक संपन्न
पुणे पर्यटनाला नवी चालना; पीएमपीएमएलच्या मार्ग क्रमांक ६ व ७ मध्ये नव्या स्थळांचा समावेश