September 11, 2025

मी पुणे पोलीसांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करणार – एकनाथ खडसे

पुणे, २९/०७/२०२५: दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात हाउस पार्टीच्या नावाखाली ड्रग्स पार्टी वर पोलिसांनी छापेमारी करत एकूण ७ जणांना ताब्यात घेतलं आहे.यात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल मनिष खेवलकर यांच्यासह ६ जणांना देखील अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी माझी बदनामी करण्यासाठी हे केलं असून मी पुणे पोलीसांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल आहे.

पुण्यात आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एका रेव्ह पार्टी वर छापा टाकत एकनाथ खडसे यांच्या जावई यांना अटक केली.पोलिसांना माझे काही प्रश्न आहे की रेव्ह पार्टी ची व्याख्या काय आहे.याला रेव्ह पार्टी म्हणता येते का तिथ ना डान्स होत ना म्युझिक होत.विनाकारण आम्हाला बदनाम केलं जात आहे का कारण पोलिसांनी खाजगी ठिकाणचे व्हिडिओ काढून ते माध्यमांना दिले हे पोलिसांनी बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे.तसेच या प्रकरणी डॉ. प्रांजल खेवलकर यांना पहिला आरोपी का करण्यात आलं आहे.पोलिसांनी जे चित्रीकरण दाखवलं आहे त्यात महिलेच्या पर्स मध्ये अंमली पदार्थ सापडलं आहे.तरीही प्रांजल खेवलकर यांना पाहिलं आरोपी करण्यात आलं आहे.विनाकारण आम्हाला बदनाम करण्यात आलं आहे.तसेच डॉक्टरांनी जो रिपोर्ट दिला तो मिडियाकडे कसा आला गेल्या काही प्रकरणात ससून च नाव खराब झालं असून जे रक्ताचे नमुने घेण्यात आली आहे त्या बाबत छेडछाडी होऊ शकते.अलीकडे ससून च नाव खराब आहे म्हणून या सगळ्या प्रकरणाची सीसीटीव्ही मागणार आहे असं यावेळी खडसे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की माझ्या जावई ने सांगितलं आहे की मी आयुष्यात कधीही ड्रग्स घेतलं नाही.माझ्यावर पाळत ठेवण्यात आली.सिव्हिल ड्रेस मध्ये असलेले पोलिस पाळत ठेवत होते.वेस्टिन हॉटेल मध्ये देखील पोलिस आले होते आणि तेच पोलिस पाळत ठेवत होते.पोलिस एवढी तत्परता दाखवत असेल तर हनी ट्रॅप बाबत का दाखवत नाही.नाशिक मध्ये बलात्काराची घटना घडली आहे तिथं शासनाकडून एवढी तत्परता दाखवली जात नाही. हे सगळं प्लॅन करून खडसे यांना बदनाम केलं जात आहे.पोलिसांनी व्हिडिओ काढून माध्यमांना दिले कसे याची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.तसेच काहीही झालं तर सत्य समोर येणार आहे.आमचा लढा हा चालू राहणार आहे.हनी ट्रॅप बाबत सरकार का उत्तर देत नाही तसेच सरकार त्या सीडी बाबत उत्तर का देत नाही. या प्रकरणा नंतर मी पोलिसांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करणार आहे अस यावेळी खडसे म्हणाले.

यावेळी पत्रकार परिषद सुरू असताना साध्या वेषात काही पोलीस हे पत्रकार परिषदेमध्ये आले होते यानंतर ही बाब खडसे यांच्या लक्षात आल्या नंतर ते म्हणाले की माझी पत्रकार परिषद सुरु असताना साध्या वेषातील पोलीस आले. माझ्या घराच्या बाहेर आत्ताही पोलीस आहेत.माझ्या छातीवर बसण्यचा हे प्रयत्न करत आहे.माझा सरकारला सवाल आहे की माझ्यावर पाळत का ठेवली जातेय. माझा आरोप आहे की रेव्ह पार्टी हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे. अस यावेळी खडसे म्हणाले.