पुणे, दि. १८ डिसेंबर : ” भारतीय संगीत आज जागतिक मंचापर्यंत पोहचले म्हणूनच कलेकडे सुद्धा डोळसपणे पहिले पाहिजे. काळानुरूप काही गोष्टीवर उलट विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. कलाकार आणि श्रोते या दोघांची ही जबाबदारी आहे आणि आपण ती चांगली पार पडली आहे,” अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या समारोपाच्या सत्रात डॉ. अत्रे यांनी स्वरमंचावरून श्रोत्यांशी संवाद साधला.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारात सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सवाचे मोठे योगदान आहे,असेही त्यांनी सांगत त्यांनी राग भैरवी’ने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये तराणा व ‘जागी मै सारी रैन’, ‘जगत जननी भवतारी मोहिनी तू नवदुर्गा…’ ठुमरी सादर केली.
तत्पूर्वी महोत्सवाच्या पाचव्या दिवशी उत्तरार्धातील दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी आपल्या भावस्पर्शी कथक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या ‘श्रीराम स्तुती’ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथक सादरीकरणासोबतच त्यांची ऊर्जा, हावभाव यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर रूपक तालात सात मात्रा, धमार तालमध्ये १४ मात्रा, २ स्वरचित रचना, चक्रधार पढंत त्यांनी सादर केल्या. धीरगंभीर अशा ‘श्रीराम कथा’ सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला. त्यांना झुबेर शेख ( सतार ) , पं. कालिदास मिश्रा ( तबला ) वैभव मानकर ( हार्मोनियम व गायन), वैभव कृष्ण (पढंत) , भुवन ( बासरी) यांनी साथ केली.
महोत्सवाच्या परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या ‘बिन देखे पडे नही चैन’ या भैरवीचे रेकॉर्डींग ऐकून ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता करण्यात आली
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा