लोहगावमध्ये टोळक्याचा राडा, दोघांवर कोयत्याने वार

पुणे, दि. २५ मे २०२१:-  बोलत थांबलेल्या दोघा तरूणांवर कोयत्याने वार करून जीवघेण्या हल्ला केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास लोहगावमधील साठेवस्तीवर घडली. याप्रकरणी सुनील पवार (वय २४, रा. धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ८ ते १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी सुनील  आणि त्यांचा मित्र शंभू काळे बोलत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्यांना करण राखपसरे कोठे असल्याची विचारणा केली. त्यानंतर टोळक्याने दोघेही करणचे मित्र असल्याचे बोलून सुनीलच्या रिक्षाची काच फोडली. त्याच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्यानंतर टोळक्याने शंभू काळे याच्यावरही कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव तपास करीत आहेत.