पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कौशल्य विकासासाठी प्रत्येक प्रभागामध्ये १ लाईटहाउस लवकरच सुरु करण्यात येणार आहे – महापालिका आयुक्त शेखर सिंह

पिंपरी,  11 डिसेंबर २०२२ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाउस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, “लाईटहाउस-कौशल्य विकास आणि रोजगार केंद्र” हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. लाईटहाउस हा प्रकल्प नागरी भागामधील आर्थिक दुर्बल घटकातील, त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी कार्यरत आहे. सध्या पिंपरीमध्ये एक लाईटहाऊस केंद्र मागील एक वर्षापासून कार्यरत आहे, व निगडीमध्ये महीला व बालकल्याण इमारत, यमुनानगर येथे दुसरे लाईटहाऊस नुकतेच सुरू झाले आहे. उर्वरित सर्व प्रभागामध्ये लवकरच प्रत्येकी १ लाईटहाऊस सुरु करण्यात येईल असे महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांनी दिनांक ४/१२/२०२२ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील पहिले लाईटहाऊस ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लाईटहाऊस केंद्राला भेट दिली. या लाईटहाऊस मध्ये आजपर्यंत ९५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यापैकी ३०० जणांना नोकरीदेखील मिळाली आहे. लाईटहाऊस प्रकल्पाला सीएसआर (CSR) निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.

लाईटहाऊस प्रकल्प प्रमुख महाराष्ट्र राज्य श्रीमती. दीपिका केडिया यांनी प्रकल्पाबद्दल माहिती देताना सांगितले कि, महापालिकेने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लाईटहाऊस केंद्राला जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, व ॲटलास कॉप्कोने (Atlas Copco ) यांनी सीएसआर (CSR) निधी उपलब्ध करून दिला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लाईटहाऊस मध्ये आजपर्यंत ९५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यापैकी ३०० जणांना नोकरी मिळाली आहे. डी मार्ट, सिनर्जी, एक्झिब्युरंट, रिलायन्स, एसबीआय इत्यादी नामांकित कंपन्यांमध्ये आतापर्यंत ३०० हून अधिक तरुणांना नोकरी मिळाली आहे.

भविष्यामधील कृती आराखड्याबाबत महापालिका आयुक्तांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:

– पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील सर्व लाईटहाउसमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नौकरी संदर्भात मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करा.

– लाईटहाउसमधील इच्छुक विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश हा कोर्स ऑनलाइन पद्धतीने सुरु करणार.

– व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमांना निधी देण्यासाठी लाईटहाऊसमधून व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याचे नियोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिका करणार.