कोरोनाच्या दोन महिन्यात पुणे प्रादेशिक विभागात तब्बल 81 हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित

पुणे, दि. 12 मे 2021: एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु असल्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र राबत असलेल्या महावितरणकडून कोरोना काळात देखील ग्राहकसेवा सुरुच आहे. गेल्या मार्च व एप्रिल महिन्यात पुणे प्रादेशिक विभागात तब्बल 81 हजार 596 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये घरगुती 58 हजार 990, वाणिज्यिक 10261, औद्योगिक 1964 आणि कृषिपंपांच्या 9620 आणि इतर 761 नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक असलेली वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागातील सर्व अभियंता व कर्मचारी युद्धपातळीवर कर्तव्य बजावत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालये, विलगीकरण कक्ष, ऑक्सीजन निर्मिती उद्योग व लसीकरण केद्रांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यासाठी युद्धपातळीवर केवळ 24 ते 48 तासांमध्ये कामे करण्यात येत आहे. यासोबतच वीजग्राहकांच्या मागणीनुसार नवीन वीजजोडण्या देण्याचे काम देखील कोविडचे नियम पाळत अविश्रांतपणे सुरु आहे.

पुणे प्रादेशिक विभागात गेल्या मार्चमध्ये 23 हजार 533 आणि एप्रिलमध्ये 58 हजार 63 अशा एकूण 81 हजार 596 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटकाळात देखील ग्राहकसेवा देणाऱ्या सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांचे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी कौतुक केले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायात हयगय करू नये. आरोग्याची पूर्णतः गंभीरपणे काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

गेल्या दोन महिन्यांत पुणे जिल्ह्यामध्ये घरगुती- 40,510, वाणिज्यिक- 6239, औद्योगिक- 884, कृषिपंप- 2893 व इतर 344 अशा एकूण 50 हजार 870 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर सातारा जिल्ह्यामध्ये घरगुती- 5088, वाणिज्यिक-947, औद्योगिक- 111, कृषिपंप-2083 व इतर 91 अशा एकूण 8320 वीजजोडण्या, सोलापूर जिल्ह्यामध्ये घरगुती- 3357, वाणिज्यिक- 642, औद्योगिक- 153, कृषिपंप- 2338 व इतर 70 अशा एकूण 6 हजार 560 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये घरगुती- 3330, वाणिज्यिक- 821, औद्योगिक- 94, कृषिपंप- 1374 व इतर 88 अशा एकूण 5707 आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरगुती- 6705, वाणिज्यिक- 1612, औद्योगिक- 722, कृषिपंप- 932 व इतर 168 अशा एकूण 10 हजार 139 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

कोरोना संकटात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची तातडीने क्षमतावाढ करण्यासाठी वाढीव वीजभाराची गरज निर्माण झाली आहे. त्याबाबतचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मंजुरी व आवश्यक तांत्रिक कामे ग्राहकांकडून पूर्ण झाल्यानंतर केवळ 24 ते 48 तासांमध्ये वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणकडून करण्यात आली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागात 24 ते 48 तासांमध्ये ऑक्सीजन निर्मितीच्या 4 मोठ्या प्रकल्पांना नवीन वीजजोडणी व वाढीव वीजभार देण्यात आला तर सात कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.