September 24, 2025

जपानी ‘सुशी’ या खाद्यपदार्थावरील विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. ८ जानेवारी, २०२४ : जपानी खाद्यसंस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आणि जागतिक पातळीवर खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या जपानी सुशी या खाद्यपदार्थाचा इतिहास आणि आजवरचा प्रवास उलगडणाऱ्या ‘आय लव्ह सुशी २०२४’ या प्रदर्शनाचे आज पुण्यात उद्घाटन झाले. जपान फाउंडेशन, कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई व इंडो जपान बिझिनेस काउंसिल यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरूड येथील चाणक्य इमारतीजवळ हे प्रदर्शन येत्या २० जानेवारी पर्यंत सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी एमआयटी संस्थेच्या मागील गेटने स्वप्नपूर्ती सभागृहाच्या जवळून प्रवेश करता येईल याची कृपया नोंद घ्यावी.

‘आय लव्ह सुशी’ या प्रदर्शनीमध्ये चित्रे, व्हिडीओ, स्टॅटीक आणि वर्किंग मॉडेल्स, पोस्टर्सच्या आदींच्या माध्यमातून सुशी विषयी पुणेकरांना जाणून घेता येईल. सदर प्रदर्शनात सुशी खाण्यासाठी उपलब्ध नसेल याची कृपया नोंद घ्यावी.

आज एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या आवारात या प्रदर्शनीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी कॉन्सुलेट ऑफ जपान इन मुंबईच्या सांस्कृतिक व शैक्षणिक काउंसिल मेगुमी हमरो, जपान फाउंडेशनचे भाषा सल्लागार टोमोनारी कुरोदा, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, आयजेबीसीचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे अधिष्ठाता डॉ दीपेंद्र शर्मा, एमआयटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या सह अधिष्ठाता डॉ. प्रीती जोशी, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट विभागाच्या शेफाली जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ चिटणीस म्हणाले, “भारतीय विद्यार्थ्यांना जपानी संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने आयजेबीसीच्या मदतीने आम्ही या प्रदर्शनीचे आयोजन केले असून याद्वारे जपानी खाद्यपदार्थ आणि खाद्यसंस्कृती विद्यार्थ्यांना अनुभविता येणार आहे. आज जपान मध्ये तरुणांची संख्या कमी आहे याबरोबरच तेथील कौशल्याधारित मनुष्यबळाची गरज लक्षात घेत भारतीय विद्यार्थ्यांना आज जपानमध्ये अनेक संधी आहेत.” जर आपण जपानी भाषा शिकून घेतली आणि जपानी संस्कृती अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर जपानमध्ये केवळ तुम्ही आणि तुमचे कुटुंबियच नव्हे तर पुढील तीन पिढ्यांची काळजी घेतली जाते हे इतर देशांच्या तुलनेत जपानचे वेगळेपण आहे, असेही डॉ चिटणीस यांनी नमूद केले.

या प्रदर्शनीद्वारे तरुण भारतातील पिढीपर्यंत जपानी संस्कृती पोहोचत असल्याचा आनंद यावेळी मेगुमी हमरो आणि टोमोनारी कुरोदा यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनीविषयी अधिक माहिती देत देत सुशीचे जपानी संस्कृतीमधील महत्त्व सिद्धार्थ देशमुख यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या विशेष प्रयत्नांमधून पुण्यासारख्या कॉन्सुलेट नसलेल्या शहरात या प्रदर्शनीचे आयोजन होत आहे, ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.

सुशीचा हाच प्रवास चित्रे, व्हिडीओ आणि पोस्टर्सच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोहोचावा हा ही प्रदर्शनी आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश आहे. सुशी शौकीनांमध्ये एडो साम्राज्याचा काळ (इ. स. १६०३ – १८६८) हा सुवर्णकाळ मानला जातो. एडो-शैलीतील सुशी संस्कृतीच्या समृद्ध खुणा, सुप्रसिद्ध निगिरी-झुशीचा जन्म, कालांतराने या पदार्थाच्या चवी मध्ये झालेले बदल, बदललेल्या पद्धती कलात्मकदृष्ट्या या प्रदर्शनात मांडल्या असून समकालीन सुशीचे बदललेले रूप देखील व्हिडीओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहे. सुशी बनविण्याचे पारंपारिक तंत्र ते आज जपानमध्ये अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने तयार होणारी सुशी याची माहिती देखील या प्रदर्शनीमध्ये इच्छुकांना घेता येणार आहे.

फोटो ओळ – जागतिक पातळीवर खवय्यांच्या पसंतीस उतरलेला जपानी सुशी या खाद्यपदार्थाचा इतिहास आणि आजवरचा प्रवास उलगडणाऱ्या ‘आय लव्ह सुशी’ या प्रदर्शनीला आजपासून पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या आवारात सुरुवात झाली. जपान फाउंडेशन व कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो जपान बिझिनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी व एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या सहकार्याने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी फोटोत (डावीकडून) शैफाली जोशी, डॉ रविकुमार चिटणीस, सिद्धार्थ देशमुख, मिको कोडेरा, डॉ प्रीती जोशी आणि टोमोनारी कुरोदा आदी.

येत्या २० जानेवारी पर्यंत एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील चाणक्य इमारतीच्या आवारात सकाळी १० ते सायं ५ दरम्यान ही प्रदर्शनी संपन्न होणार आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी एमआयटी संस्थेच्या मागील गेटने स्वप्नपूर्ती सभागृहाच्या जवळून प्रवेश करता येईल. प्रदर्शनी सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.