पुणे: प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या संकल्पनेत उभारलेल्या कलाकार कट्टा व कलासंगम शिल्पाचे उद्घाटन

पुणे, ०२/०७/२०२१: “महानगर पालिकेने पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आकर्षण केंद्रेही उभारायला हवेत. कलाकार कट्टा आणि कलासंगम शिल्प उभारल्याने कलेचे वैविध्यपूर्ण दर्शन तर घडेलच; शिवाय, येथे नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळेल. पुणेकर कलेला दाद देण्यात उत्स्फूर्त असल्याने हा कलाकार कट्टा गाजेल,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांच्या संकल्पनेतून नामदार गोपालकृष्ण गोखले चौकात (गुडलक चौक) उभारलेल्या कलाकार कट्टा व कलासंगम शिल्पाचे उद्घाटन  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अभिनेते-दिग्दर्शक प्रशांत दामले, पंडित संजीव अभ्यंकर, पंडितागुरु मनीषा साठे या दिग्गज कलाकारांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, डॉ. विनय थोरात, नगरसेविका नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी दिनकर गोजारे, उपअभियंता रवी खंदारे, विशाल धूत, शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, सरचिटणीस प्रतुल जागडे आदी उपस्थित होते.

गोपालकृष्ण गोखले चौकातील उपलब्ध जागेत चित्रकला, नृत्यकला आणि चित्रपट या कलासंगम घडवून आणला असून, १० फूट उंचीचे तीन मेटल शिल्प उभारले आहेत. या शिल्पकलेमुळे पुण्यातील कलासंस्कृतीची माहिती या रस्त्याने येजा करणाऱ्या पुणेकरांना होणार आहे. या चौकात गुडलक हॉटेल असल्याने येथे अनेक दिग्गज कलाकारांचा राबता असायचा. याच गुडलक कॅफेसमोरील मोकळ्या जागेत कलाकार कट्टा उभारला आहे. विविध कलाकृती बसविण्यात आल्या आहेत. या व्यासपीठाचा वापर गप्पा करण्यासाठी, नवोदित कलाकारांना कला सादर करण्यासाठी होणार आहे.

प्रशांत दामले म्हणाले, “पुण्याला कलेचा खूप मोठा वारसा आहे. येथे अनेक कलाकार घडले आहेत. विविध कलागुणांनी ठासून भरलेल्या पुण्यात हा उपक्रम खूप लोकप्रिय होईल. कोरोनामुळे थांबलेल्या कलाकारांच्या गप्पा, कट्टा, कला सादरीकरण पुन्हा एकदा लवकर सुरु व्हावे. रसिक श्रोत्यांना आनंद देणारे कार्यक्रम सुरु व्हावेत. या कट्ट्यावर चित्रकला, गायन-वादन, गप्पांचे कार्यक्रम, कविसंमेलने रंगतील. तेव्हा हा नजारा पाहणे आल्हाददायी असेल.” भाजप युवा मोर्चाच्या युवती अध्यक्षा प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. तर नगरसेविका नीलिमा खाडे यांनी आभार मानले.

‘आर्ट वीक’ भरविण्याचा संकल्प
या रस्त्याला आणि चौकाला कलाकारांची एक परंपरा आहे. देव आनंद, गुरुदत्त, श्रीराम लागू, जब्बार पटेल, नसिरुद्दीन शहा यांच्यासह अनेक कलाकार येथे असत. कलेसंदर्भात चर्चा रंगत असत. त्यांच्या आठवणी जपाव्यात, तसेच नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ मिळावे, या दृष्टीने हा कलाकार कट्टा आणि कलासंगम महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या काळात मुंबईतील काळा घोडा फेस्टिवलप्रमाणे पुण्यातही ‘आर्ट वीक’ घेण्याचा संकल्प आहे. त्यातून वेगवेगळ्या कलाकारांना आपली कला सादर करता येईल, तसेच पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल. – प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेविका, प्रभाग १४