September 24, 2025

अमनोरा पार्कटाऊन पासून नव्याने सुरू झालेल्या ॲपेक्स रोडचे चेतन तुपे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

पुणे दि. २३ जानेवारी, २०२४: हडपसर भागातील अमनोरा पार्कटाऊन पासून नव्याने सुरू झालेल्या ॲपेक्स रस्त्याचे उद्घाटन आज आमदार चेतन तुपे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
अमनोरा पार्क टाऊनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरूद्ध देशपांडे, उपसरपंच रूपेश तुपे, अमनोराचे जे.के. भोसले, अमोल तुपे , सचिन बहीरट, बजरंग तुपे, अनिकेत तुपे, कुणाल कामठे, अमोल कामठे, अमोल काळे, संदीप तुपे तसेच अमनोराचे सर्व पदाधिकारी व साडेसतरानळी परिसरातील नागरीक याप्रसंगी उपस्थित होते
साधना सहकारी बँकेपासून ते अमनोरा टाऊनकडे जाणारा हा सुसज्ज रस्ता सुरू झाल्याने वाहतुकीस होणारा अडथळा दूर होऊन, शालेय वाहतूक करणाऱ्या गाड्या, व्हॅन या मार्गाने जाऊ शकतील यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास यावेळी आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केला.
मला आठवते काही वर्षांपूर्वी दूर दूर पर्यंत शेती असणाऱ्या या भागात वाढत्या शहरीकरणामुळे लोकवस्ती वाढली. वेगाने विकसित होणारे पुण्याचे उपनगर म्हणून हडपसर पुढे आले. या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असतो. अमनोरा पार्क टाऊनने तब्बल ५ कोटी रुपये खर्च करून हा रस्ता नागरिकांसाठी बांधून देत त्यांना मोठा दिलासा दिला आहे, याबद्दल चेतन तुपे यांनी अमनोरा आणि अनिरुद्ध देशपांडे यांचे आभार मानले.
इतक्या मोठ्या पातळीवर काम करणाऱ्या अमानोरा समूहाने सामाजिक बांधिलकी जपत या परिसरातील शेतकरी व नागरिक यांप्रती जपलेले आपलेपण वाखाणण्या जोगे आहे असेही तुपे यावेळी म्हणाले.