October 22, 2025

एप्रिल अखेरपर्यंत मिळकतकराची बिले मिळणार

पुणे, २२ एप्रिल २०२५ ः महापालिकेतर्फे दरवर्षी एक एप्रिलपासून मिळकतकराची बिल आकारणी सुरु होते. मात्र, यंदा मिळकतकर विभागाच्या अधिकाऱ्यांना बिल तयार करण्याचे काम वेगात पूर्ण करता आले नाही, पीटी तीन अर्जाची छाननी अर्धवट ठेवल्याने बिल आकारणी थांबविण्याची नामुष्की आली आहे. आता एक मे पासून बिल आकारणी केली जाणार असल्याने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या मिळकतकराची एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.

पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्याच्या कालावधीत निवासी मिळकत करावर ५ आणि १० टक्के सूट दिली जाते. त्यामुळे पुणेकर कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे येतात. या दोन महिन्यात एक हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होते. पण यावेळी प्रशासनातील गोंधळामुळे महापालिकेची तिजोरी अजूनही रिकामीच आहे.

मिळकतकरात पूर्वीप्रमाणेच चाळीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यांची सवलत गेली होती, त्यांच्याकडून पीटी तीन अर्ज भरून घेऊन ही सवलत पुन्हा देण्यात येणार आहे. सुमारे दीड लाख अर्ज महापालिकेने भरून घेतले. पण त्याची छाननी व नवे बिल ३१ मार्च पर्यंत तयार होऊ शकले नाही. त्यामुळे १ एप्रिलपासून कर आकारणी होऊ शकलेली नाही.

आता एक मे पासून कर आकारणी केली जाणार असून, त्याची तयारी सुरु आहे. नागरिकांना एक मे पासून नवीन आर्थिक वर्षातील बिले मिळतील अशी माहिती पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.