पुणे, ४ जून २०२५: राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण १२,८८० कोविड चाचण्या केल्या गेल्या असून, त्यात ९५९ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४३५ रुग्ण बरे झाले असून सध्या सक्रिय रुग्णसंख्या ५१० इतकी आहे.
राज्याचे आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांच्या मते, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढली असली तरी हा विषाणू धोकादायक नाही. नवे रुग्ण सामान्यतः सौम्य स्वरूपाचे असून त्यावर आरोग्य विभागाने सतर्कतेने चाचण्या वाढवण्याचा निर्देश दिला आहे.
पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात एकूण १६७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १३५ रुग्ण घरच्या उपचारावर आहेत तर ३२ रुग्णांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय ५० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मागील दोन आठवड्यांत रुग्णसंख्येत थोडी वाढ दिसून येत असून, वातावरणातील बदलामुळे व्हायरल संसर्ग वाढल्याचा आढावा पवार यांनी दिला.
याबाबत राधाकिसन पवार म्हणाले, “राज्य शासनाने कोविड परिस्थिती गंभीरपणे घेतले असून १०० टक्के पॉझिटीव्ह रुग्णांच्या चाचण्या पूर्ण करण्याचे आणि तपासणीचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोना लाट येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, पण त्या अफवांवर कोणालाही विश्वास ठेवू नये. आरोग्य विभागाने सर्व तयारी केली आहे.”
जर रुग्णांना श्वसनात अडचण, कोमा किंवा अन्य गंभीर लक्षणे जाणवली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नव्या व्हेरियंटचे स्वरूप सौम्य असून रुग्णसंख्या वाढत असली तरी घाबरून जाण्याचे काहीही कारण नसल्याचेही राधाकिसन पवार यांनी स्पष्ट केले आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार