December 3, 2025

भारत–पाक सामना होणार; खेळात राजकारण आणू नये ; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, १३ सप्टेंबर : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत उद्या (१४ सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाले असून सामना खेळू नये अशी मागणी होत आहे. मात्र, या संदर्भात विचारणा झाल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो, तिथे निर्णय घेण्यात आलेला आहे. माझ्या माहितीनुसार सामना होणार आहे. खेळात राजकारण आणू नये, असेही अनेकांचे मत आहे.”

पुण्यातील हडपसर येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात अजित पवार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, “१४० कोटींच्या देशात मतमतांतरे असतातच. काहींना वाटते सामना खेळू नये, काहींना वाटते खेळाडू वृत्ती दाखवावी. मात्र अंतिम निर्णय केंद्रस्तरावर झाला असून सामना पार पडणार आहे.”

नागरिकांच्या प्रश्नांवर ग्वाही
या जनसंवाद कार्यक्रमात पवार यांनी पुणेकरांशी संवाद साधताना नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, “रस्ता, ड्रेनेज, लाईटची कामे पूर्ण करू. अधिकारी सगळे इथेच आहेत, प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नागरिकांनी एकोप्याने राहावे आणि शहराचे वातावरण चांगले ठेवावे.”

सातारा गॅझेट प्रकरण
सातारा गॅझेट प्रकरणाबाबत विचारणा झाल्यावर अजित पवार म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की कुणावर अन्याय होणार नाही. सर्वांनी बसून मार्ग काढला जाईल.”

शिंदे–फडणवीस मतभेदांवर स्पष्टीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चांना अजित पवार यांनी फेटाळले. “असे काही नाही. आम्ही तिघेही एकत्र बसतो, कधीही असं जाणवलं नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही चांगले काम करतात आणि राज्याचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे,” असे ते म्हणाले.

कोमकर हत्या प्रकरणावर भूमिका
नाना पेठ येथील आयुष कोमकर हत्याकांडाबाबत पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “लहान वयात गंभीर गुन्ह्यांत मुलांचा सहभाग वाढतो आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन १८ आणि २१ या वयाच्या मर्यादा कमी करण्याबाबत विचार करावा. पोलिसांनी या प्रकरणात 7 जणांना अटक करून ‘मोक्का’ लावला आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली न राहता पारदर्शक तपास करावा,”असेही त्यांनी स्पष्ट केले.