भारतीय खेळाडूंना मिळणार वैज्ञानिक आधार; फिट २ स्पोर्टस आणि ब्रिटनस्थित एलेना बाल्टाचा फौंडेशनचा सहकार्य करार

पुणे, 20 मे 2021: पुण्यातील उदयोन्मुख टेबल टेनिसपटू पृथा वर्टिकर, राष्ट्रीय विजेती धावपटू अवंतिका नराळे, उदयोन्मुख कुमार टेनिसपटू मानस धामणे, ऋतुजा चाफळकर यांसह 10 भारतीय खेळाडूंना ब्रिटनस्थित स्पोर्टस फाऊंडेशन आणि भारतातील फिट २ स्पोर्ट  यांच्या ऑनलाईन चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या दोन्ही संस्थामध्ये अलिकडेच सहकार्य करार करण्यात आला आहे. 
 
खेळ आणि खेळाशी निगडीत असणाऱ्या अनेक गोष्टींसाठी सध्या बिकट परिस्थिती आहे. अशा वेळी खेळाडूंचा आत्मिवश्वास कायम राखणे सर्वात महत्वाचे  असते. खेळाडूंना दुखापती आणि अपयशातून बाहेर काढण्यासाठी हा आत्मविश्वास फायद्याचा ठरतो. अर्थात, यासाठी खेळाडूंना शक्यतितक्या शास्त्रीय पद्धतीने कशी मदत मिळेल याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. हाच दृष्टिकोन ठेवून तब्बल दोन वर्षांच्या चर्चेनंतर  जगातील विविध क्रीडा क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तिमत्व यासाठी एकत्र आली असून, त्यांनी आभासी मार्गदर्शनाचे एक व्यासपीठ खुले करून दिले आहे. यातून खेळाडूंना  आपल्या कामगिरीचे अवलोकन देखील करता येणार आहे. 
 
खेळ आणि संबंधित असणाऱ्या आघाड्यांवर सध्याची साथीची परिस्थिती लक्षात घेता केवळ खेळाडूंचा नैतिकता कायम ठेवणे महत्त्वाचे नाही, तर त्यांच्या जखमांचे पुनर्वसन करण्यासाठी शक्य तितक्या चांगल्या मार्गाने मदत करणे देखील आवश्यक आहे.  हाच मार्ग स्पोर्टस फौंडेशन आणि फिट २ स्पोर्ट यांनी आखला आहे. 
 
यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाच्या पहिल्या यादीत भारताच्या दहा अव्वल खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अॅथलेटिक्सची १०० मीटर शर्यतीची राष्ट्रीय विजेती अवंतिका नराळे, टेबल टेनिसची ज्युनियर आणि सब-ज्युनियर राष्ट्रीय वजेती पृथा वर्टिकर,तायक्वांदोचा राष्ट्रीय खेळाडू परवंध कृष्णन, इनलाईनस्केटिंग प्रकारातील सिद्धांत कांबळे, दुर्गा मिरजकर, स्मित सपारिया, जलतरणपटू मिहिर आंब्रे, उदयोन्मुख कुमार टेनिसपटू मानस धामणे, ऋतुजा चाफळकर, कुमार क्रिकेटपटू आयुष खुटे आणि राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू अनन्या पाटिल यांचा समावेश आहे.
 
या खेळाडूंना ब्रिटनच्या एलिना बाल्टाचा फाऊंडेशनच्या तज्ज्ञांकडून दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षण सत्रात सहभागी होता येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंसाठी हे मार्गदर्शन मोफत असणार आहे. ब्रिटनच्या महिला टेनिस संघाचे माजी प्रशिक्षक निनो सेव्हेरिनो हे या ईबीएफचे संस्थापक आहेत. विंबल्डन विजेत्या अॅंडी मरे याची आई ज्युडी मरे आणि टेनिस सम्राज्ञी मार्टिना नवरातिलोवा हे या ईबीटीचे आधारस्तंभ आहेत. त्यांना ब्रिटनमधील अनेक खेळाडूंचे सहकार्य लाभले आहे. 
 
भारताच्या बाजूने या उपक्रमात डॉ.अजित मापारी यांनी स्थापन केलेल्या फिट २ स्पोर्ट या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. ही संस्था डॉ. मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या दखापतीचे व्यवस्थापन तसे त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. या दोन संस्थांच्या सहयोगामुळे खेळाडूंच्या बौद्धिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनाला बळकटी येणार आहे. फिजिओ मेघन बेलसरे आणि क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ या दोन संस्थांना एकत्र आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले असून खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्यांचा पाया मजबूत करण्याचे उद्दिष्ट या संस्थेचे आहे. या दोन संस्थाच्या सहयोगाची संपूर्ण माहिती बाल्टचा फाऊंडेशन आणि फिट २ स्पोर्ट यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचायला मिळणार आहे.