October 26, 2025

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष टेनिस स्पर्धेत भारताच्या करण सिंग, रामकुमार रामनाथन यांचे आव्हान संपुष्टात

पुणे, 17 फेब्रुवारी 2025 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये भारताच्या करण सिंग याला, तर अंतिम पात्रता फेरीत रामकुमार रामनाथन यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस संकुलात सुरू असंलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत आठव्या मानांकित कॅनडाच्या ॲलेक्सिस गॅलार्नौ याने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या करण सिंगचा 6-4, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना 1 तास 3 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये ॲलेक्सिस गॅलार्नौने पहिल्याच गेममध्ये करणची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर ॲलेक्सिसने या सेटमध्ये वर्चस्व राखत हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्येदेखील सुरुवातीला पहिल्या सेटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. ॲलेक्सिसने करणची सर्व्हिस पहिल्या गेममध्ये ब्रेक केली. पण दुसऱ्या गेममध्ये करणने ॲलेक्सिसची सर्व्हिस ब्रेक केली व बरोबरी साधली. ॲलेक्सिसने जोरदार खेळ करत करणला कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही. पाचव्या व सातव्या गेममध्ये ॲलेक्सिसने करणची सर्व्हिस पुन्हा भेदली व हा सेट 6-1 असा जिंकून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात मॉनेकोच्या व्हॅलेंटीन वॅचेरोट याने डेन्मार्कच्या चौथ्या मानांकित एल्मर मोलरचा 5-7, 6-2, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकालासह दुसरी फेरी गाठली.

अंतिम पात्रता फेरीत बेल्जियमच्या सातव्या मानांकित किमर कोपेजन्स याने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या रामकुमार रामनाथनचा 6-4, 6-7(5), 6-0 असा पराभव केला. हा सामना २तास ३ मिनिटे चालला. पेट्र बार बिर्युकोव्ह याने आरएसएच्या अकराव्या मानांकित क्रिस व्हॅन विक[चा 6-3, 6-4 असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली. जपानच्या नवव्या मानांकित मासामिची इमामुराने चौथ्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक एलिसचा 6-1, 6-4 असा तर, सहाव्या मानांकित इलिया सिमाकिन याने दहाव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या जेरी वेसेलीचा 7-5, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. बेलारूसच्या मायकेल गीर्ट्स याने जर्मनीच्या आठव्या मानांकित जस्टिन एग्नेलचा 7-6(4), 6-2 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: पहिली फेरी:
व्हॅलेंटीन वॅचेरोट(मॉनेको)वि.वि.एल्मर मोलर (डेन्मार्क)5-7, 6-2, 6-4;
ॲलेक्सिस गॅलार्नौ [8] (कॅनडा)वि.वि. करण सिंग (भारत)6-4, 6-1;

अंतिम पात्रता फेरी:
किमर कोपेजन्स[7](बेल्जियम) वि.वि.रामकुमार रामनाथन(भारत)6-4, 6-7(5), 6-0;
मायकेल गीर्ट्स(बेलारूस) वि.वि.जस्टिन एग्नेल [8](जर्मनी) 7-6(4), 6-2;
पेट्र बार बिर्युकोव्ह वि.वि.क्रिस व्हॅन विक[11] (आरएसए) 6-3, 6-4;
मासामिची इमामुरा[9] (जपान)वि.वि.ब्लेक एलिस[4](ऑस्ट्रेलिया) 6-1, 6-4;
इलिया सिमाकिन[6] वि.वि.जेरी वेसेली [10](चेक प्रजासत्ताक)7-5, 6-1;

दुहेरी: पहिली फेरी:
जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन)/ ज्युरिज रॉडिओनोव(ऑस्ट्रिया)वि.वि.एन्झो कौकॉड(फ्रांस)/ रिओ नोगुची(जपान)6-3, 5-7, 12-10.