गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत भारताच्या मधुरिमा सावंत, हितेश चौहान यांचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे,दि.2 डिसेंबर 2022: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात भारताच्या मधुरिमा सावंत हिने तर, मुलांच्या गटात हितेश चौहान यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेशकेला. तर, दुहेरीत मुलांच्या गटात अमन दहिया व क्रिश त्यागी यांनी, तर मुलींच्या गटात लिडिया पॉडगोरिचनी व कामोनवान योडपेच यांनी विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत फ्रांसच्या सातव्या मानांकित मार्गोट फंथाला हिने सहाव्या मानांकित भारताच्या तेजस्वी दबसचा 6-3, 6-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या मानांकित पुण्याच्या मधुरिमा सावंतने लकी लुझर ठरलेल्या कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवचा 6-2, 6-1 असा सहज पराभव केला. सामन्यात मधुरिमाने ऐश्वर्यावर निर्विवाद वर्चस्व राखले.मधुरिमाने सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये ऐश्वर्याची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत आघाडी घेतली. या सेटमध्ये मधुरिमाने आपली आघाडी कायम ठेवत ऐश्वर्याविरुद्ध हा सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील मधुरिमाने ऐश्वर्याला कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही. सामन्यात 3-0 अशा फरकाने आघाडीवर असताना चौथ्या गेममध्ये मधुरिमाने ऐश्वर्याची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकून अंतिम फेरीच्या दिशेने पाऊल टाकले.

मुलांच्या गटात उपांत्य फेरीत भारताच्या हितेश चौहान याने अधीरित अवलचा टायब्रेकमध्ये 5-7, 7-6(4), 7-6(9) असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या सामन्यात तैपेईच्या चिह एन हौला सामन्यापूर्वीच डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली व त्यामुळे सर्बियाच्या अलेक्झांडर डस्कालोविकला पुढे चाल देण्यात आली. अंतिम फेरीत सर्बियाच्या अलेक्झांडर डस्कालोविकपुढे भारताच्या हितेश चौहानचे आव्हान असणार आहे.

दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत अमन दहियाने क्रिश त्यागीच्या साथीत बुशन होबम व दक्ष प्रसाद यांचा 6-2, 7-6(3) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात थायलंडच्या लिडिया पॉडगोरिचनी व कामोनवान योडपेच या जोडीने भारताच्या रुमा गायकैवारी व मधुरिमा सावंत यांचा 6-4, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्या जोडीला करंडक व 75 गुण, तर उपविजेत्यांना करंडक व 45 गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे आणि आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: एकेरी: मुले:
हितेश चौहान(भारत)वि.वि.अधीरित अवल(भारत) 5-7, 7-6(4), 7-6(9);
अलेक्झांडर डस्कालोविक(सर्बिया)[6] पुढे चाल वि.चिह एन हौ(तैपेई)[7] 0-0;

मुली:
मार्गोट फंथाला(फ्रांस)[7]वि.वि.तेजस्वी दबस(भारत) [6] 6-3, 6-1;
मधुरिमा सावंत(भारत)[3]वि.वि.ऐश्वर्या जाधव(भारत) 6-2, 6-1;

दुहेरी: मुले: अंतिम फेरी: अमन दहिया(भारत)/क्रिश त्यागी(भारत)[1]वि.वि. बुशन होबम(भारत)[2]/दक्ष प्रसाद(भारत)6-2, 7-6(3)

मुली: उपांत्य फेरी:
लिडिया पॉडगोरिचनी (थायलंड) / कामोनवान योडपेच (थायलंड)[2] वि.वि.सोनल पाटील(भारत)/एंजल्स रॉड्रिक्स/रिझो[4]6-2, 7-5;
रुमा गायकैवारी (भारत) / मधुरिमा सावंत (भारत) [3]वि.वि.सुहिता मारूरी(भारत)/मार्गोट फंथाला(फ्रांस)[1]6-4, 6-3;
अंतिम फेरी: लिडिया पॉडगोरिचनी (थायलंड) / कामोनवान योडपेच (थायलंड)[2] वि.वि.रुमा गायकैवारी (भारत) / मधुरिमा सावंत (भारत) [3] 6-4, 6-3.