चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्याला प्राधान्य-उद्योगमंत्री

पुणे, 19 ऑक्टोबर 2022: – उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत कोर्टयार्ड मेरियेट येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक आणि विद्युत समस्या सोडविण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, चाकण औद्योगिक क्षेत्रात विद्युत चार उपकेंद्र स्थापन करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. महावितरणकडून अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. पाणी पुरवठा आवश्यक प्रमाणात करण्याबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. स्थानिक उद्योजकांची भूखंडाची मागणी अधिकाऱ्यांनी घ्यावी, त्यांनाही प्राधान्याच्या उद्योगांसोबत भूखंड देण्याबाबत विचार करण्यात येईल.

लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शासनाची सुविधा घेऊन भूखंडाचा वापर उद्योगांसाठी न करणाऱ्या उद्योगांबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कामगारांसाठी रुग्णालय उभारण्याबाबत विचार झाल्यास शासनातर्फे आवश्यक सुविधांसाठी सहकार्य करण्यात येईल. उद्योग सुरू करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी मंजुरी प्रक्रियेत अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न आहे, त्याचा फायदा उद्योजकांना होईल.

रस्त्याच्या स्थितीबाबत अधिकाऱ्यांनी एकत्रित माहिती द्यावी. या संदर्भात आवश्यक सुधारणा त्वरित करण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्यात यावे, अशा सूचना उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

चाकण औद्योगिक क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता येथील समस्या सोडविण्यासाठी, शासनाच्या इतर संबंधित विभागांशी आणि उद्योग संघटनांशी समन्वय साधण्यासाठी नियमित समन्वय बैठका घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणाबाबत सर्व्हेक्षण करण्यास सांगितले आहे, सर्व्हेक्षणानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. असेही श्री. सामंत म्हणाले.

हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमध्ये जागा उपलब्ध नसल्याने तळेगाव औद्योगिक परिसरातही आयटी उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.