पुणे जिल्ह्यातील २५,००० कुटुंबांना शोष खड्डे बांधण्यासाठी जिल्हा परिषद आणि नाम फाऊंडेशनचा पुढाकार

पुणे, २२/१/२०२२: जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाच्यावतीने

ग्रामीण भागातील २५,००० कुटुंबांना सोक पिट्स अर्थात शोष खड्डा बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे.

नाम फाऊंडेशनच्या मदतीने हे कार्य केले जाणार आहे, अशी माहिती परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

प्रसाद म्हणाले,” स्वयंपाकघर आणि स्नानगृहातील वापरलेले पाणी साठविण्यासाठी या शोष खड्ड्याचा वापर होतो. विशेषतः पुण्यातील ग्रामीण भागातील पाण्याचा ताण असलेल्या १०३ गावांमध्ये आणि डासांच्या रोगाची प्रकरणे असलेल्या ७९ गावांमध्ये या पाण्याचा पुनर्वापर करून या गावांमधील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मदत होईल. तसेच जिल्ह्यात भूजल 4 टीएमसीने वाढण्यास आणि मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, फॅलेरिया आणि झिका यांसारख्या वेक्टर बोर्न रोगांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यामुळे दुर्गंधी टाळता येईल आणि कमी खर्चात सांडपाणी व्यवस्थापन सुनिश्चित होईल.”

या उपक्रमांतर्गत नाम फाऊंडेशनतर्फे बांधकाम साहित्य दान करण्यात येईल, तर मजुरीचा खर्च मनरेगा अंतर्गत दिला जाईल. जिल्ह्याला मनरेगा अंतर्गत 2.5 कोटी रुपयांचा निधी देखील मिळणार आहे, ज्याचा वापर जनावरांच्या शेड, ग्रामीण गोदामे, दुपारच्या जेवणासाठी मेस इत्यादी बांधकामासाठी करता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसाद यांनी केले आहे.