आगामी लाटा टाळण्यासाठी कोविड-समुचित वर्तनाचे आग्रहपूर्वक पालन करा- डॉ.गुलेरिया

नवी दिल्ली, 8 जून 2021: “कोविड-19 महामारीच्या आगामी लाटांच्या वेळी बालकांमध्ये तीव्र आणि गंभीर आजार निर्माण होणार असल्याची माहिती चुकीची आहे. आगामी लाटांमध्ये बालकांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे सिद्ध करणारी कोणतीही आकडेवारी भारतात किंवा जगातही उपलब्ध नाही.” अशी माहिती दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी दिली. ते आज दिल्लीत पत्र सूचना कार्यालयाच्या राष्ट्रीय माध्यम केंद्रात कोविड-19 विषयी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“भारतात दुसऱ्या लाटेच्या वेळी बाधित होऊन रुग्णालयात दाखल झालेल्या बालकांपैकी 60% ते 70% बालकांना एकतर सहविकार (कोमॉर्बिडिटी) होते किंवा त्यांची रोगप्रतिकारशक्ती क्षीण होती. सुदृढ व आरोग्यसंपन्न बालके सौम्यश्या लक्षणांनंतर रुग्णालयात दाखल करण्याची गरज न भासता बरी झाली”, असेही डॉ.गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

कोविड-समुचित वर्तन हीच आगामी लाटा थोपविण्याची गुरुकिल्ली

कोणत्याही महामारीच्या निरनिराळ्या लाटा का येतात, हेही एम्सच्या संचालकांनी स्पष्ट करून सांगितले. “सामान्यतः, श्वसनसंस्थेस बाधित करणाऱ्या विषाणूंमुळे निर्माण होणाऱ्या साथरोगाच्या निरनिराळ्या लाटा येतात; 1918 स्पॅनिश फ्ल्यू, एच 1 एन 1 (स्वाईन) फ्ल्यू ही त्याची काही उदाहरणे होत. 1918 स्पॅनिश फ्ल्यूची दुसरी लाट सर्वात मोठी होती, नि त्यानंतर जरा कमी तीव्रतेची तिसरी लाट येऊन गेली.” असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

सार्स-सीओव्ही-2 हा श्वसनसंस्थेशी संबंधित रोग निर्माण करणारा विषाणू आहे, हे आपल्याला माहीतच आहे.

1.   सहज बाधित होऊ शकणारी लोकसंख्या असेल तेव्हा अनेक लाटा उद्भवतात

जेव्हा लोकसंख्येचा बहुतांश हिस्सा संसर्गाविरुद्ध प्रतिकारक्षम होतो, तेव्हा विषाणू प्रदेशविशिष्ट होतो व त्याचा प्रादुर्भाव ठराविक ऋतूमध्ये होऊ लागतो- जसे H1N1 चा प्रादुर्भाव सामान्यपणे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात होताना दिसतो.

2.   विषाणूमध्ये बदल घडून आल्याने लाटा उद्भवू शकतात (उदा-विषाणूचे नवे प्रकार आल्याने)

नवीन पिढीचे विषाणू अधिक प्रमाणात संसर्ग पसरवू शकत असल्याने विषाणूजन्य रोगाचा फ़ैलाव वाढण्याची शक्यता बळावते.

3.   लाट उद्भवण्याचे एक कारण ‘मानवी वर्तन’ हेही असू शकते

डॉ.गुलेरिया एक सावधगिरीचा इशारा देतात. ते म्हणतात, “जेव्हा रुग्णसंख्या वाढते, तेव्हा लोकांमध्ये एक प्रकारची भीती असते आणि त्यामुळे मानवी वर्तन बदलते. कोविड-समुचित वर्तनाचे काटेकोर अनुपालन लोक करतात आणि प्रादुर्भावाची साखळी औषधेतर उपायांनी तोडण्यात यश येऊ लागते. परंतु जेव्हा अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु होते- म्हणजे व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात होते, तेव्हा लोकांना असे वाटू लागते की ‘आता फारसा संसर्ग होणार नाही’. असा विचार करण्यामुळे कोविड-समुचित वर्तनाचे योग्य पालन करण्यात लोकांकडून हयगय होण्याची शक्यता उत्पन्न होते. परिणामी, विषाणू पुन्हा डोके वर काढतो, समाजात संसर्ग पसरू लागतो व दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण होते.”

आगामी लाटा थांबविण्यासाठी, आपल्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात लसीकरण होईपर्यंत किंवा तिच्यात नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता विकसित होईपर्यंत आपण कोविड-समुचित वर्तनाचे आग्रहपूर्वक पालन केलेच पाहिजे, असे संचालक महोदयांनी सांगितले. “जेव्हा पुरेशा प्रमाणात लोकांचे लसीकरण झालेले असेल, किंवा जेव्हा या संसर्गाला थोपविणारी नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता आपल्यात आलेली असेल, तेव्हा या लाटा थांबतील. त्यामुळे, कोविड-समुचित वागणुकीचे काटेकोर व शिस्तशीर पालन हाच एकमेव उपाय आहे.” असे डॉ.गुलेरिया यांनी सांगितले.