October 20, 2025

आमदार बापूसाहेब पठारे यांचा रस्ते व पायाभूत सुविधा विकासकामांचा पाहणी दौरा

वडगावशेरी, २५ जून २०२५ : वडगावशेरी मतदारसंघातील रस्ते सुधारणा, रुंदीकरण, नवीन रस्ते जोडणी, भुयारी मार्ग आदी विकासकामांना गती देण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आज (ता. २६) महत्त्वपूर्ण भागांत पाहणी दौरा केला. यावेळी रखडलेली किंवा तांत्रिक अडचणीत अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात आल्या.

यावेळी पठारे यांनी स्पष्ट केले की, “गुणवत्तापूर्ण व नियोजित रस्त्यांचे जाळे हा कोणत्याही भागाच्या विकासाचा कणा असतो. त्यामुळे अडथळे दूर करून कामांना गती देणे ही अत्यावश्यक गरज आहे. या पाहणी दौऱ्यामुळे महापालिका व संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना स्पष्टपणे आखता येतील.”

पाहणीतील महत्त्वाचे रस्ते आणि कामे :
गुंजन चौक ते कल्याणीनगरकडे जाणारा प्रस्तावित रस्ता – मेट्रो मार्गाखालील स्थितीचा आढावा
गुंजन चौक ते विमानतळ रस्ता – अंडरपास बांधणीसंदर्भातील शक्यता व अंमलबजावणी
मुळीक निवासस्थान ते वडगावशेरी गाव (जुना मुंढवा रस्ता) – रुंदीकरण व विस्तारीकरण
बेग नगर स. नं. २२ – खराडी-शिवणे जोडणाऱ्या रस्त्याची स्थिती
बोल्होबा चौक ते पुणे मनपा हद्दीपर्यंत – रस्त्याची बांधणी व सुसज्जिकरण
ग्रँड रोड ते नगर रस्ता (जकात नाका) – पश्चिम बाजूच्या मिळकतधारकांशी चर्चा व भूसंपादन
डीपी रोड २०५ अंतर्गत – लोहगाव ते वाघोली जोडणारा रस्ता (स. नं. १२३, १२४)
जकात नाका–भाजी मंडई–तालीम मनपा शाळा–मैफील इस्टेट – मार्गाचा समन्वय व दुरुस्ती
खराडी पोलीस स्टेशन ते जनक बाबा दर्गा चौक – रस्त्याचे रुंदीकरण

सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागी जाऊन रस्त्यांची पाहणी केली. महापालिका, पथविभाग आणि इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून कामांना त्वरित गती देण्यात येईल, असे ही पठारे यांनी सांगितले.

या दौऱ्यात अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंते अनिरुद्ध पावसकर व युवराज देशमुख, तसेच सुरेंद्र हेही पठारे उपस्थित होते.