पुणे, दि. २४ जून, २०२५: महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी या आशिया खंडातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवसृष्टीतील अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि पर्यटक यांनी शनिवार व रविवार अशा दोन्ही दिवशी मोठ्या संख्येने सहभाग घेत योग सत्रांमध्ये प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार आणि विविध योगासनांचे प्रात्यक्षिक केले तसेच सामान्य आजारांसाठी योगोपचार बाबत माहितीचा देखील लाभ घेतला.
या योग सत्रांचे मार्गदर्शन योग प्रशिक्षिका अनघा कुलकर्णी यांनी केले. त्या व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून सामाजिक भान राखून, योग जीवनशैली आणि योगोपचारातून लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारावे या उद्देशाने समाजहिताच्या प्रेरणेने योग वर्ग घेतात.
कार्यक्रमात त्यांनी ताडासन, त्रिकोणासन, गरुडासन, भुजंगासन, वज्रासन, वीरभद्रासन, उष्ट्रासन, धनुरासन, अर्धहलासन इत्यादी अनेक आसनांची प्रात्यक्षिके घेत त्यांची लाभासहीत सविस्तर माहिती दिली. योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगताना उपस्थितांनीही योग स्वीकारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. योग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही योग सत्रे सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य घेण्यात येत असून सर्वांना ३० जून पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. यानिमित्ताने स्वागतपर काढण्यात आलेली योगदिन विशेष रांगोळी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आणि सेल्फी पॉईंट ठरला.
More Stories
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान
Pune: जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध
Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ