October 27, 2025

मेंदूच्या स्वास्थ्यासाठी सहा घटकांविषयी जागरुक राहणे आवश्यक – प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम

पुणे, दि. २० डिसेंबर, २०२४ : “मानवी मेंदूच्या स्वास्थ्यासाठी सहा प्रमुख घटकांचे पालन आवश्यक आहे. आपले स्वास्थ्य ही आपलीच जबाबदारी आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. आरोग्य चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून असे भान जागविण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे”, असे प्रतिपादन प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आणि नागपूर येथील ‘ब्रेन अॅंड माईंड इन्स्टिट्यूट’चे संचालक – सल्लागार पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. पी एम शाह फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डॉ. मेश्राम यांनी क्लॅप देत विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आरोग्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केले.

यावेळी आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजक अॅड. चेतन गांधी, पी एम शहा फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण कोठाडिया, वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलासभाई राठोड, पी. एम. मुनोत ट्रस्टचे अध्यक्ष शरदभाई मुनोत, फ्लेअर नेटवर्क सिस्टिम्सचे अध्यक्ष सतीश कोंढाळकर, विश्वस्त डॉ. विक्रम काळूस्कर, डॉ. किरण शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शारीरिक व मानसिक आरोग्यासंबंधित विविध विषयांवर जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून दर वर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा महोत्सव २० व २१ डिसेंबर रोजी विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्यासाठी प्रवेश दिला जाईल. यावर्षी महोत्सवात मानसिक आरोग्य, स्तनांचा कर्करोग, अवयव दान, पर्यावरण आदी विषयांवरील ३४ लघुपट व माहितीपट दाखवले जाणार आहेत.

डॉ. मेश्राम यांनी मेंदूच्या स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप, ताणमुक्तता, सामाजिकतेची वृत्ती आणि व्यसनांपासून मुक्ती, या सहा घटकांचे संतुलन पाळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. ‘व्यायाम हा केवळ शारीरिक नव्हे तर बौद्धिक तसेच मानसिक पातळीवरही गरजेचा आहे. आपल्या व्यावसायिक कामांसाठी एकूण वेळेपैकी ७० टक्के वेळ वापरा, पण २५ टक्के वेळ स्वतःच्या छंद, आवडीसाठी मोकळा ठेवा, असेही ते म्हणाले. डासांपासून सर्वाधिक धोका संभवतो, त्यामुळे त्यापासून जपा, असा सल्ला देतानाच, जंक फूड, मीठ व साखर टाळण्यावर त्यांनी भर दिला’.

“वैद्यकीय व्यावसायिकांनी वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत संशोधन, ज्ञान, तांत्रिक माहिती सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. नव्या शोधांचा लाभ आपल्या रुग्णांपर्यंत त्वरित पोचवण्याची जबाबदारी आपली आहे. आरोग्य चित्रपट महोत्सव ही वैशिष्ट्यपूर्ण लोकचळवळ असून, आरोग्यविषयक जनजागरणाचे कार्य सातत्याने करत आहे”, असेही त्यांनी नमूद केले.

आयोजक अँड चेतन गांधी यांनी प्रास्ताविकात सामाजिक दायित्व जपण्याच्या भावनेतूनच आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करत असल्याचे सांगितले. यंदा जगभरातून दाखल झालेल्या दीडशे प्रवेशिकांमधून निवडक ३४ लघुपट, माहितीपटांचा महोत्सवात समावेश केल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी चित्रपटांची निवड करणारे परीक्षक अनुजा देवधर, सुखदा खिस्ती, विनय जवळगीकर यांचा सन्मान डॉ. मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी योगदान देणाऱ्या डॉ. अनिता मोहिते, डॉ. संतोष फरांदे, डॉ. विनय चाटी, संतोष गोगले तसेच शाळा व मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. मोनिका जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.