फेसबुकवरून जुने फर्निचर विकत घेणे पडले महागात, जेष्ठाची १ लाख ३२ हजारांची फसवणूक

पुणे, १६/०६/२०२१: फेसबुकवर जुन्या वस्तूंच्या विक्रीची जाहिरात देऊन नागरिकांना फसविण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना सॅलसबरी पार्कमध्ये घडली आहे. फेसबुकद्वारे जुने फर्निचर स्वस्तामध्ये विकत देण्याची जाहिरात करून सायबर चोरट्याने जेष्ठाला १ लाख ३२ हजार रूपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार जेष्ठ नागरिकाचे फेसबुकवर खाते असून त्याठिकाणी त्यांना फर्निचर विक्रीची जाहिरात दिसली. त्यांनाही फर्निचर खरेदी करायचे होते. त्यामुळे त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी जाहिरातीमध्ये दाखविलेले ६० हजार रूपयांचे फर्निचर ५५ हजार रूपयांचा देण्याचे आमिष आरोपींनी तक्रारदार यांना दाखविले. त्यानंतर त्यांना पैसे ऑनलाईन पाठविण्यासाठी एक खाते क्रमांक दिला. त्या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्याने जेष्ठाला फर्निचर पाठविण्यासाठी त्यांच्याकडे आणखी पैशाची मागणी केली. वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून १ लाख ३२ हजार रूपये घेतले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे फर्निचर पाठविले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर तपास करत आहेत.