विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूर पिंक पँथर्स संघाचा यु मुंबा वर रोमहर्षक विजय

पुणे, 7 नोव्हेंबर 2022: मशाल स्पोर्टस् यांच्या वतीने आयोजित नवव्या विवो प्रो कबड्डी स्पर्धेत शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत जयपूर पिंक पँथर्स संघाने यु मुंबा संघावर ४२-३९ अशी मात करत आपले आव्हान राखले. मध्यंतराला जयपूर संघाने २०-१९ अशी आघाडी घेतली होती. 
 
श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील आजच्या पहिल्या सामन्यात यु मुंबा आणि जयपूर यांच्यातील लढती बाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. दोन्ही संघांनी पहिल्या ११ सामन्यांमध्ये प्रत्येकी सहा सामने जिंकले होते. जयपूर संघाचा चढाईपटू अर्जुन देशवाल याने पहिल्याच चढाईत तीन गडी बाद करीत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ त्याने दोन गडी बाद करीत मुंबा संघावर पहिला लोण चढविला. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला त्यांनी आठ गुणांची आघाडी घेतली होती. तथापि मुंबा संघाचा हैदर अली एकरामी, जय भगवान व आशिष कुमार यांनी चढाईत गुण वसूल करीत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. तेराव्या मिनिटाला त्यांनी जयपूर संघावर लोण चढवीत रंगत निर्माण केली. मध्यंतराला जयपूर संघाकडे एक गुणाची आघाडी होती. 
 
उत्तरार्धात सुरुवातीलाच आशिष कुमारच्या खोलवर चढायांच्या जोरावर मुंबा संघाने आणखी एक लोण चढवीत सामन्यास कलाटणी दिली. ३० व्या मिनिटाला त्यांच्याकडे दोन गुणांची आघाडी होती.‌ तथापि शेवटची सात मिनिटे बाकी असताना जयपूर लोण चढविला आणि पुन्हा सामन्याचे पारडे पलटविले. पाच मिनिटे बाकी असताना त्यांनी दोन गुणांची आघाडी घेतली होती. मुंबा संघाच्या खेळाडूंनी आघाडी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. जयपूर संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवीत विजय संपादन केला