जनआशिर्वाद यात्रा की ‘जनआजार’ यात्रा? – एका मुंबईकराचा खडा सवाल!

मुंबई, 25/08/2021: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेने मुंबईतील वातावरण ढवळून निघालं आहे. भाजपची ही यात्रा अनेक कारणांनी चर्चेत राहिली आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या या यात्रेविरुद्ध ही ‘‘जनआशिर्वाद यात्रा की ‘जनआजार’ यात्रा?’’ असा खडा सवाल उठवत आदित्य सरफरे या एका सजग मुंबईकराने यात्रेविरोधात थेट याचिका दाखल केली आहे.

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने कोविड विषयक नियमांचे पालन अजूनही बंधनकारक आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने जनआशिर्वाद यात्रा काढणे अत्यंत चुकीचे आहे असे सरफरे यांचे म्हणणे आहे.

करोना काळात राजकीय सभा आणि रॅली बंदी इत्यादी विविध गोष्टींवर बंदी असताना जनआशिर्वाद यात्रा कशी निघू शकते असा सवाल त्यांनी उठवला आहे. सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास बंद असल्यामुळे आधीच रस्त्यावरील वाहतूकीचा बोजावरा उडाला आहे. त्यात या यात्रेमुळे ठिकठिकाणी होणारी गर्दी, त्यामुळे पसरू शकणारे आजार या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तसेच गर्दी करून मुंबईकराच्या जीवाशी खेळत असल्याप्रकरणी त्यांनी वकिलामार्फत जनआशिर्वाद यात्रेविरुद्ध याचिका दाखल केली आहे.

महा लॉ फर्मचे वकिल ॲड.महेंद्र कुमार पाध्ये यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे असे समाजसेवक सरफरे यांनी सांगितले.