September 24, 2025

22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत जपानच्या मोयुका उचीजिमा हिला विजेतेपद

पुणे, 28 जानेवारी 2024: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत जपानच्या मोयुका उचीजिमा हीने विजेतेपद संपादन केले.
 
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीच्या सामन्यात जपानच्या तिसऱ्या मानांकित मोयुका उचीजिमाने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या ऑस्ट्रियाच्या टीना नादिन स्मिथचा 6-4, 6-0 असा पराभव केला. हा सामना 1तास 14 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये टिनाने सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये मोयुकाची सर्व्हिस रोखली. पण पुढच्याच गेममध्ये मोयुकाने टिनाची सर्व्हिस ब्रेक करून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सहाव्या गेमपर्यंत आपापल्या सर्व्हिस राखल्या. अखेर मोयुकाने आपला खेळ उंचावत आठव्या गेममध्ये टिनाची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये टिनाला अखेरपर्यंत सुर गवसलाच नाही. मोयुकाने पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये टिनाची सर्व्हिस ब्रेक करून हा सेट 6-0 असा सहज जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.  मोयुकाने याआधी नवी मुंबईत झालेल्या 25000डॉलर आयटीएफ टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. याआधी मोयुकाने 2021मध्ये याच स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
 
स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या मोयुका उचीजिमाला करंडक, 50आयटीएफ गुण व 4903डॉलर(4लाख 10हजार रुपये)तर, उपविजेत्या  करंडक, 33 आयटीएफ गुण आणि 2591.67डॉलर (2लाख 15हजार रुपये)अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)चे व्यवस्थापकीय संचालक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अश्र्विन गिरमे, सहाय्यक रेफ्री लिना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी गट: अंतिम फेरी:
मोयुका उचीजिमा(जपान)[3]वि.वि.टीना नादिन स्मिथ (ऑस्ट्रिया)6-4, 6-0.