पत्रकारांनो तुम्ही रूग्णांच्या नजरेत खलनायक, गिधाड झाले आहात

अभय खैरनार
(पत्रकार- हिंदूस्थान टाईम्स, पुणे) (मुक्काम पोस्ट कोवीड हॉस्पिटल)

पुणे, २० मे २०२१: करोनाची दुसरी लाट मार्चपासून सुरु झाली. तेव्हापासून मी आणि माझे कुटुंब याचे शिकार झालो. 10 मार्च 2021ला सुरू झालेला हॉस्पिटलचा प्रवास 14 मे 2021 ला संपला. या 65 दिवसाच्या कालावधीत माणसे आणि हॉस्पिटल बदलत गेली पण कुटुंबातील कोणीतरी एकजण हॉस्पिटलमध्ये होता. या काळात मी स्वतः मार्च मध्ये आठवडाभर वेगळ्या ऑपेरेशनसाठी दिनानाथ मंगेशकरला दाखल होतो. २५ एप्रिलला मला करोना झाल्याने महापालिकेच्या बाणेर हॉस्पिटलला चार दिवस आणि घरी आल्यावर पुन्हा त्रास झाल्याने पंधरा दिवस राव नर्सिंग होम असा २७ दिवस रूग्णालयात राहिलो . सरकारी, खासगी, आयसोलेशन, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड या सगळयांचा अनुभव घेतला.  रोज मनात असो किंवा नसो या काळात अनेक करोना रूग्णांसोबत संवाद घडत गेला. सोबत वेगवेगळ्या कालावधीत घरातील सातजणबाधित झाले. त्यापैकी चार जणांना दाखल करावे लागल्याने, रुग्णाच्या नातेवाईकाची मानसिकता काय असते ते पण अनुभवायला मिळाले. त्या अनुभवावर आधारित हे लेखन किंवा डायरी – अभय खैरनार (पत्रकार, हिंदुस्थान टाइम्स, पुणे)

हो, मी स्वतः पत्रकार असलो, तरी आताच्या परिस्थितीमध्ये आपण खलनायक झालो आहोत हे वास्तव आपल्याला मान्यच करावे लागेल. संपादकीय विभागाला याचे चिंतन करावे लागेल आणि काही सकारात्मक बदल करावे लागतील. सत्ताधारी लोकांच्या नजरेत खलनायक ठरलो असतो तर पत्रकार म्हणून मला स्वतःला याचा अभिमान वाटला असता. पण वाईट याचे वाटते की, ज्यांच्यासाठी पत्रकारिता करायची त्या वाचक, प्रेक्षक आणि सर्वात महत्वाचे या महामारीमधील सगळयात फटका बसलेला आणि करोनाबाधित रुग्णांच्या नजरेत पत्रकार खलनायक आणि गिधाड ठरले आहेत.

टीव्ही, ऑनलाईन, प्रिंट आणि सोशल मीडियावरील बातम्या – करोनाबाधित रुग्ण आयसोलेशन बेडवर असेल, तर ऑक्सिजन बेडवर पाठवत आहे. जे ऑक्सिजनवर आहेत त्यांना आयसीयू नाहीतर थेट व्हेंटिलेटरवर पाठवत आहे. पत्रकारितेवर एवढी वाईट वेळ आली की डॉक्टर लोकांना औषधा सोबत, बातम्या पाहू नका, वाचू नका हे सांगावे लागत आहे. पेशेंटचे पण सपोर्ट ग्रुप तयार होत आहेत आणि ते एकमेकाला बातम्या पाहू नका असा सल्ला देत आहेत.

आता नकारात्मक बातमी कशी परिणाम करते ते सांगतो. मी आयसीयू मध्ये बरा होत असताना हिंमत करून व्हाट्स अप उघडले. इतर पोस्ट वाचत असताना अचानक मिडिया संबंधित गु्पवर पोस्ट वाढल्याने, माझ्या कडून ऊत्सूकतेपोटी क्लिक केल्या गेल्या. बातमी होती हडपसरचे बातमीदार जगदाळे यांच्या निधनाची,  अंगावर सरकण काटा आला. जो तो फोटोला टॅग करून आदरांजली वाहत होता. मला सेवलेकर प्रकरण माहित असल्याने माझ्या मानसिकतेवर जो आघात व्हायचा तो झाला होता. माझी मॉनिटर वरील ऑक्सिजन लेव्हल 92 वरुन सर्रकन खाली येऊन 79 झाली. तेवढ्यात नर्सचे पण मॉनिटरकडे लक्ष गेले आणि ती धावतच आत आली. काय झाले विचारले आणि अंगाला लावलेल्या हर्ट बीट’च्या वायर काढून पोटावर झोपायला सांगितले. तिनेच ऑक्सिजन पुरवठा 6 लिटरवरून 10 लिटर केला. शांत पडून रहा सांगून तिच्या जागेवर जाऊन काचेतून मॉनिटर पहात राहिली. वीस मिनिटांनी माझी ऑक्सिजन लेव्हल 92-94 पर्यंत वाढून स्थिर झाली. नंतर तिने पुन्हा ऑक्सिजन पुरवठा 6लिटरला पूर्ववत केला.

अजून जेव्हा मी बरा होऊन घरी आलो तर पहिल्या सकाळी खासदार राजीव सातव यांचे पोस्ट कोविड निधन झाल्याची बातमी समजली. ती बातमी द्यायची तर अशी स्पर्धा लागली की लोकांनी पर्सनल चॅटवर मला टाकली. त्याचा परिणाम व्हायचा तो झालाच. पण कुटुंबीय समोर दिसत असल्याने लगेच सावरलो.

मी पत्रकारांची बाजू जाणतो तसा रुग्णांची पण बाजू प्रत्यक्ष अनुभवून आलो आहे. मी रुग्णालयात दाखल असताना तर काही हुशार डॉक्टर आणि नर्सेसने माझाच बातम्या पाहू नका हे सांगण्यासाठी वापर करून घेतला. हे बघा पत्रकार असूनपण ते बतम्यांपासून लांब राहा सांगतात, आता तुमची मर्जी मोबाईलवर बातम्या पाहायच्या आणि क्रिटिकल व्हायचे की नाही ते, असे ते इतर पेशंटला सांगायचे. विशेष म्हणजे या काळात ज्या संपादकांना, पत्रकार सहकार्यांना माझ्या तब्बेतीबाबत समजत गेले आणि ज्यांचे फोन आले त्यांनी पण मला आवर्जून सल्ला दिला –  बातम्या अजिबात पाहू नको, वाचू नको.

आता मला प्रश्न पडतो आपण स्वतःच मान्य करतो की एवढी निगेटिव्हिटी पत्रकारितेमध्ये आली आहे, तर आपण किमान महामारीपुरता तरी काही सकारात्मक बदल करू शकतो का?

या काळात माझा किमान शंभर रुग्णांसोबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संवाद झाला असावा, कारण मला सेपरेट रूम कधी मिळूच शकला नाही. नावाला सेमी प्रायव्हेट रूम मिळाली,  रुग्ण संख्याच एवढी होती की, एका रूममध्ये चार ते पाच रुग्ण असायचे. किमान हॉस्पिटलच्या बेडवर असताना, रुग्ण जे बोलतात ते प्रामाणिक आणि सत्य बोलतात. त्यामुळे एवढ्यावरून, मी नक्की सांगू शकतो की, तुमचा हेतू नसला तरी तुम्ही ज्यांच्यासाठी पत्रकारिता करतात, त्यांच्या नजरेत खलनायक झाला आहात. यात इलेक्ट्रॉनिकवाले जास्त खलनायक असले तरी, प्रिंट – ऑनलाईन आणि सोशल मीडियावाले यांच्याबाबत पण तोच राग आहे.
पत्रकारांनी या महामारीमध्ये योग्य काम केले आहे, देशाचा राजा आणि प्रधान नागडा आहे, हे लोकांना पटले आहे. विमान बंद करण्यात उशीर, मजुरांची पायपीट, कुंभमेळा, पश्चिम बंगाल च्या निवडणुकीतला बेदरकारपणा आणि कळस म्हणजे लसी योग्यवेळी खरेदी न करणे, बाहेर लस पाठवून देशवासियांना मृत्युच्या खाईत लोटणे हे सगळे सामान्य लोक बोलायला लागले आहेत. कदाचित गैर भाजपा सरकार असते तर, त्या पक्षाच्या नेत्यांनी आणि मंत्रांनी राजाला जाहीर सुनावले पण असते. पण दुर्दैवाने जोडगळी पार्टीपेक्षा मोठी झाल्यानें, भाजपामध्ये एकाही नेत्याला राजाला सांगायची हिम्मत झाली नाही.

पत्रकारितेमध्येदेखील भाजपा – बिगरभाजपा अशी उभी दुफळी पडली असली तरी, किमान हे वास्तवं ऐकून महामारीपुरत्या काही सुधारणा होण्याची अपेक्षा असल्यामुळे हा लेखनप्रपंच.

देश पातळीवर काही होईल की नाही माहित नाही पण किमान पुणे आणि महाराष्ट्रामध्ये नक्की आपण काही चांगले बदल करू शकतो. सोशल मीडिया आणि लहान ऑनलाइनपोर्टल वाल्यांकडून अपॆक्षा नाही, पण प्रमुख चॅनेल, वृत्तपत्र आणि ऑनलाईन टीम मधील वरिष्ठानी थोडे चिंतन केले तर या महामारीपुरते तरी आपण काही मांडणीत बदल करून सगळ्यात प्रभावित घटकाला जो करोना बाधित झाला आहे, त्याला दिलासा देऊ शकतो. किंबहुना काही सकारात्मक बातम्या देऊन त्याच्या बरे होण्याच्या लढाईत मदत करु शकतो.

आता पुढचा प्रश्न संपादक किंवा वरिष्ठ पत्रकार एकत्र येतील का, आणि आलेच तर एकमत होईल का ? तर याचे उत्तर सगळ्या पत्रकारांना माहित आहे. पण प्रत्येक माध्यम समूहाने किंवा त्यांच्या संपादकीय टीमने विचार केला तर हे लगेच होऊ शकते. चॅनेल मध्ये संपादकीय पेक्षा जे लोक बॅकग्राऊंड साऊंड लावतात, सादरीकरण करताना जे रंग वापरून बातम्या अंगावर आणतात, त्यांची मानसिकता बदलावी लागेल. आकाशवाणी च्या बातम्या कितीही नकारात्मक असल्या तरी लोकांची मानसिकता बदलत नाही. किंवा काही आंतरराष्ट्रीय चॅनेल ज्या सौम्यपणे बातम्या सादर करतात त्यांचे अनुकरण करावे लागेल.

अजून चर्चा होऊ शकते की आम्ही थोडीच बातम्या घडवतो? जगात, देशात, राज्यात, शहरात घडते, ते दाखवतो. वास्तव घडते ते दाखवायचे नाही का? सरकारला धारेवर धरायचे नाही का ?

पण ही शंभर वर्षात घडणारी घटना आहे. मानवजातीवर आलेले हे संकट आहे. युद्ध चालू असताना रोज जेवढे मृत्यू होत नसतील, त्याच्या जास्त प्रमाणात रोज लोक मरण पावत आहेत. कारगिल युद्ध सुरु असताना जेवढे जवान शहीद होत होते, तेवढे लोक काही शहरात, राज्यात मरत आहेत. युद्धाच्या वेळी केंद्र सरकार जसे राष्ट्रीय आणीबाणी म्हणून लढते, तसे काही पावले या परिस्थितीत उचलताना दिसत नाही. प्लेग किंवा स्पॅनिश फ्लूच्या वेळीचा माध्यमांचा वेग आणि आताच्या माध्यमांची व्याप्ती याचा पण विचार करावा लागेल. स्पॅनिश फ्लूच्या वेळी इतर शहरात काय होते याचा परिणाम दुसऱ्या शहरातील नागरिकांवर होत नसेल किंवा कळत पण नसेल. आता दुसऱ्या मिनिटाला तुम्हीच तयार केलेली बातमी, सोशल मीडियावर, तुमच्या मोबाईलवर वेगवेगळ्या ग्रुपवर येऊन पडते. दिल्ली मध्ये झालेल्या मृत्यांच्या आकडयाने, पुण्यातील नागरिकांच्या मानसिकतेवर लगेच परिणाम होतो. पहिला लॉकडाऊन असताना इटलीच्या बातम्या ऐकून इथे आपण घाबरत होतो.

आता आपण पत्रकार म्हूणन काय बदल करू शकतो याचे उत्तर माझ्याकडे नाही किंवा माझा एवढा आवाकापण नाही, हे मला प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल. पण आपण सगळ्यांनी चिंतन केले, तर नक्की काही उत्तर सापडू शकतात आणि ते लगेच अमलात आणून जनमानसात झालेली प्रतिमा बदलवू शकतो.

मला सुचवावेसे वाटलेले काही पर्याय
– सध्या राजकीय कार्यकर्ते आणि नेते पत्रक काढून एकमेकांवर आरोप करत आहेत. आंदोलन करून, पत्रकार परिषद बोलवून चिखलफेक करत आहे. त्यांना माहित आहे याला प्रसिद्धी मिळते. आपण ते थांबवू या.

त्याऐवजी जे राजकीय कार्यकर्ते विधायक काम लोकांसाठी करत आहे ते दाखवू या. याने कार्यकर्ते पण घडतील. नेत्यांना पण समजले की, कशाला महत्त्व मिळते, ते पण लोकांना मदत करतील, तसे राजकीय पक्षाचा कार्यक्रम आखतील. यांच्या आंदोलन आणि पत्रामुळे ना उद्धव ठाकरे राजीनामा देणार, ना मोदी जास्त लसी खरेदी करणार आहे. मग आपण सध्यातरी अशी प्रसिद्धी थांबवू या.

– रोज एकतरी सकारात्मक बातमी आग्रहाने अधोरेखित करायची- जशी की लासलगावच्या चांगदेव होळकर यांनी २५ एच सीआरटी स्कोअर आणि ८० पेक्षा जास्त वय असताना करोनावर केलेली  मात.

– शासनाव्यतिरिक्त अनेक संस्था, छोटे ग्रुप चांगले काम करत आहेत त्या बातम्यांचे प्रमाण वाढवणे.

– रोजचा बाधित, मृत रुग्णाचा आकडा पत्रकारच तयार करतात आणि समाज माध्यमावर वर पाठवता, पुढच्या मिनिटाला राजकीय लोक खाली त्यांचे नाव टाकून ते गावभर फिरवतात. खरंच आता लोकांना याचा कंटाळा आला आहे. खूप व्हाट्स अँप ग्रुप वर तर करोना संबंधित काही पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे. लोकांना नको असेल तर त्यांच्यावर अशी आकडेवारी लादण्यात काय समाधान आहे

– सगळयात जास्त बदल ऑनलाईन माध्यमे आणि चॅनेलवाल्यानी करायची गरज आहे. हे बदल करताना वेळ पडल्यास त्यांनी  मानसोपचार तज्ञ यांची मदत घ्यावी.

– या सगळ्या आजारपणात मी जेव्हा काही दिवस ऑफिस जॉईन केले तेव्हा काही सकारात्मक बातम्या दिल्यात आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला. वेगवेगळ्या मराठी वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या वाचून, शासन सोडून इतर महितीतील, नवीन ग्रुप्स, संघटना कशा चांगले काम करत आहे ते एकत्र मांडले. शांतीलाल मुथा, जैन संघटना, हेल्प रायडर, मुस्लिम संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काही राजकीय कार्यकर्ते अशा अनेकांचा यात सहभाग होता.  या बातमीचा एवढा चांगला परिणाम झाला की, मला लगेच दुपारी पुण्यातील दुसऱ्या इंग्रजी वर्तमानपत्र व्यवस्थापनात काम करणारे अधिकाऱ्यांचा फोन आला. तशी माझी बातमी काही फार भारी नव्हती. इतर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचे तुकडे -तुकडे मी एकत्र आणले होते आणि त्या लोकांशी बोलून बातमी पुढे नेली होती. पण त्या अधिकाऱ्याला आणि त्याच्या वडीलांना ती बातमी एवढी भावली की , त्यांनी माझा नंबर शोधून मला फोन केला आणि अशा बातमीची आता गरज आहे, असे सांगितले. त्यांना अशा लोकांना चांगली आर्थिक मदत पण करायची होती. मी त्यांना संबधितांचा संपर्क क्रमांक देऊन मोकळा झालो आणि तुम्हीच योग्य कोण ते ठरवून मदत करा हे सुचविले.

चला तर मग सगळे मिळून काही प्रयोग करू यात, सरकारचे (सगळेच महापालिका , राज्यशासन, केंद्र सरकार) कान टोचत रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करूया आणि त्यांना बरे होण्याची ऊर्जा देऊया.