बाणेर येथील जम्बो रुग्णालयास मुदतवाढ

पुणे, ता. १ : बाणेर येथील महापालिकेच्या जम्बो रुग्णालयाला तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत आज (मंगळवारी) घेण्यात आला.

त्यासाठी ७५ कोटी रुपये इतका खर्च होणार आहे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.


भविष्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी बाणेर येथे दुसरे जम्बो रुग्णालय उभारण्यात येणार आहे. हे रुग्णालय पुढील दोन महिन्यात तयार होईल. त्यामध्ये आॅक्सिजन वाढविण्यावर भर आहे. यात १५० फाउलर बेड असतील ,त्यातील १३० बेड महापालिकेला खरेदी करेल तर २० बेड सीएसआर मधून मिळणार आहेत. आयसीयू बेड खरेदीसाठी इमर्सन एक्स्पोर्ट्स कंपनीच्या निधीतून १४ लाख ५२ हजार रुपये खर्च करण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टवर अधिकार्यांची वर्णी
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल एज्युकेशन ट्रस्टवर अधिकारी व पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


यामध्ये शहर अभियंता, मुख्य लेखापाल, मालमत्ता व प्रशासन विभागाचे उपायुक्त, मुख्य विधी अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल एज्युकेशन ट्रस्टने ठरवलेला एक सभासद अशा सात जणांची या ट्रस्टवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

७७ टक्के कमी दराने औषध खरेदी

महापालिकेने आरोग्य सहाय्य योजनेअंतर्गत औषध खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. यामध्ये औषधे व इतर साहित्याच्या एमआरपीवर सर्वाधिक सवलत देणाऱ्या औषध विक्रेत्याकडून खरेदी केली जाते. एमआरपी पेक्षा तब्बल ७७ टक्के सुट देणाऱ्या ठेकेदाराचा प्रस्ताव मान्य केला आहे. महापालिकेकडून एकूण सात कोटी रुपयांची औषधे घेतली जाणार आहेत.