पुण्यातील जम्बो रुग्णालयास ३ महिन्याची मुदतवाढ

पुणे,३ जून २०२१: पुणे शहरातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी, आगामी काळातील गरज लक्षात घेता बाणेर येथे सध्या कार्यान्वित असलेल्या ‘जम्बो रुग्णालया’ला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी ७५ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. येथे सध्या व्यवस्थापन करत असलेली संस्थाच, हे काम पुढे चालवणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बाणेर येथील नव्या कोव्हिड रुग्णालयासाठी आवश्यक एकूण १५० बेडपैकी १३० बेड खरेदी करण्यासाठी ‘इमर्सन एक्स्पोर्ट्स’ कंपनीकडून ‘सीएसआर’ अंतर्गत मिळालेल्या ५१ लाख २१ हजार रुपयांच्या निधीतून १२ लाख ३५ हजार रुपये आणि त्यावरील ‘जीएसटी’ला मान्यता देण्यात आली. दीड ते दोन महिन्यांत हे रुग्णालय उभारण्यात येईल, असेही रासने म्हणाले. याच रुग्णालयासाठीच्या ‘आयसीयू बेड’ खरेदीसाठी ‘इमर्सन’च्या निधीतून १४ लाख ५२ हजार रुपये खर्च करण्यासही ‘स्थायी’ने मान्यता दिली.

महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल एज्युकेशन ट्रस्टवर आणखी काही सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शहर अभियंता, मुख्य लेखापाल, मालमत्ता आणि प्रशासन विभागाचे उपायुक्त, मुख्य विधी अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक यांचा समितीत समावेश करण्यास तसेच, या मेडिकल एज्युकेशन ट्रस्टने ठरवलेला एक सभासद अशा सात जणांची या ट्रस्टवर नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.