संचारबंदीमध्ये घरगुती वीजवापराकडे लक्ष ठेवा – महावितरण

पुणे, दि. 19 एप्रिल 2021: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भावामुळे संचारबंदी सुरु असल्याने वर्क फ्रॉम होम आणि उन्हाच्या झळा वाढत असल्याने प्रामुख्याने घरगुती वीजवापराचे प्रमाण वाढणार आहे. या कालावधीमधील नियंत्रित बिलासाठी वीजवापराकडे लक्ष ठेवावे व मीटर रिडींगची दररोज पाहणी करावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या संचारबंदी असल्याने बहुतांश नागरिक घरातच आहे. कार्यालयीन कामे देखील घरातूनच सुरु आहे. दुसरीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे घरातील पंखे, एसी, कुलर, टिव्ही, संगणक किंवा लॅपटॉप आदी उपकरणांचा वापर वाढणार आहे. पर्यायाने विजेचा वापर सुद्धा वाढणार आहे. यातील पंखे, कुलर्स आदींचा वापर 18 ते 24 तास होण्याची शक्यता आहे. या उपकरणांचा अनावश्यक वापर टाळावा व वीजवापराकडे लक्ष ठेवावे. यासाठी मीटरमधील केडब्लूएच रिडींगची दररोज पाहणी करता येईल. लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व पब्लिक सर्व्हिसेस वर्गवारीच्या ग्राहकांना संभाव्य वीजबिलाची पडताळणी ही महावितरण मोबाईल अॅप व www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जे ग्राहक दरमहा 80 ते 90 युनिट किंवा 280 ते 290 युनिट वीजवापर करतात त्यांचा वीजवापर वर्क फ्रॉम होम आणि वाढत्या उन्हामुळे साधारणतः अनुक्रमे 100 किंवा 300 युनिटपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्लॅबपुढील युनिटला दुसऱ्या स्लॅबचा दर लागणार आहे. घरगुती विजेचा वापरासाठी 1 एप्रिल 2021 पासून नवीन वीजदर लागू झाले आहेत. वहन दर प्रतियुनिट 1 रुपये 38 पैशांसह स्लॅबनुसार शून्य ते 100 युनिट- 3 रुपये 44 पैसे, 101 ते 300 युनिट- 7 रुपये 34 पैसे, 301 ते 500 युनिट- 10 रुपये 36 पैसे, 500 युनिटपेक्षा अधिक वीजवापरासाठी 11 रुपये 82 पैसे असे दर आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक सोसायट्या किंवा परिसर सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे मीटर रिडींग घेणे शक्य न झाल्यास ग्राहकांना सरासरी वीजबिल जाण्याची शक्यता आहे. मात्र ग्राहकांनी स्वतः रिडींग पाठविल्यास योग्य वीजवापराचे वीजबिल देण्यात येईल किंवा पुढील महिन्यात रिडींग घेऊन प्रत्यक्ष केलेल्या वीजवापराचे स्लॅब बेनिफिटसह वीजबिल देण्यात येईल. यामध्ये ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भुर्दंड बसणार नाही.

कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने ग्राहकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व वीजबिलांचा भरणा घरबसल्या ‘ऑनलाईन’ करावा. तसेच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे. लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा निःशुल्क आहे.