पुणे, दि 06/02/2025: महाराष्ट्र राज्याचे तंत्रज्ञान व मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे; उद्योगधंद्ये वाढीच्यादृष्टीने जागतिक पातळीवर संवाद साधण्यात येत असून त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण निर्मिती करीता पोलीस दलाने काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
चिखली येथील पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, विजय शिवतारे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, शंकर जगताप, बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएमपीएल व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, मुंबईनंतर पुणे शहराचे पोलीस आयुक्तालय मोठे होते. पुणे शहराचा विस्तार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात झालेले नागरीकरण तसेच पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणातील औद्योगिकीकरण आणि परिसरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवणे याबाबींचा विचार करुन सन २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. यावर्षी नवीन पोलीस आयुक्तालय स्वतःच्या इमारतीत जाणार असून त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, शासकीय इमारती चांगल्या झाल्या पाहिजे असा राज्य सरकारचा आग्रह आहे. यादृष्टीने देशातील सर्वात आधुनिक पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. त्याच प्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारतही होत आहे. याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर इमारत या ठिकाणी होत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता अत्यंत चांगली निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या इमारती बघितल्यानंतर एखाद्या खासगी विकासकाला मागे टाकतील, अशा आहेत.

More Stories
Pune: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील अपघातांच्या विरोधात ‘डिव्हायडरची आरती’; अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन