पुणे: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी वकील संरक्षण विधेयकात कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी

पुणे, २० जुलै २०२१: राज्यात तसेच देशात वकिलांवर सातत्याने हल्ले होत राहतात. त्यामुळे वकिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वकील संरक्षण कायद्यात सुधारणा करून त्यात हल्ले करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करावी,अशी मागणी आझाद समाज पार्टी लीगल सेल’चे अध्यक्ष ॲड तोसिफ शेख यांनी केली.


ॲड शेख आणि त्यांचे सहकारी ॲड दीपक गायकवाड, स्वप्नील गिरमे, मोहमद शेख,सुजित जाधवर,जयदीप डोके पाटील, सुरज जाधव, राम लोणारे पाटील, कुमार काळेल पाटील, परमजीत गोयल, महेश गवळी, महेश तुपे, सना शेख, रवी वडमारे, कादिर मिलवाला, अफ्फान सय्यद यांनी देशाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय मंत्री कायदा आणि न्याय, बार कौन्सिल अध्यक्ष या सर्वांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
ॲड शेख म्हणाले,” विरोधी पक्षाकडून वकिलांवर खटला सोडविण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर सदरील कृत्य अजामीनपात्र करण्यात यावे तसेच १ लाख दंड व ५ वर्षांची शिक्षा करण्यात यावी, वकिलांवर राज्य बार कौन्सिलच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही खटले दाखल करण्यापासून प्रतिबंध करावा, वकिलांना शिवी देणे हा अजामीनपात्र गुन्हा घोषीत करण्यात यावा, कोर्टाच्या आवारात वकिलांना शिवी देणे, धमकी देणे, मारहाण करणे असे कृत्य घडले तर तात्काळ न्यायाधीशांनी स्वतः फिर्याद देऊन सदरील व्यक्तीविरुद्ध कोर्टाच्या अवमान केल्याच्या संधर्भात न्यायालयीन अवमान अधिनियम, १९७१ प्रमाणे गुन्हा दाखल करावा. तसेच वकिलांना भारतीय दंड विधान कलम ३५३ च्या कक्षेत घेऊन वकिलांना संरक्षण देण्यात यावे, जर पोलिसांनी किंवा अन्य व्यक्तींनी वकिलांच्या न्यायालयीन कामात अडथळा निर्माण केल्यास त्यांच्याविरोधात ३५३ चा गुन्हा दाखल करावा. तसेच कोणतेही खटल्यात पोलिसांनी वकिलांना साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर सदरील कृत्य हे अजामीनपात्र राहील तसेच ५ वर्षाचे कठोर कारावासाची शिक्षा करण्यात यावी, अशा विविध मागण्या आम्ही या निवेदनाद्वारे केल्या आहेत.”