जग बदलूया: समाज, विज्ञान व महा- इतिहासाच्या जोडणीतून’: सिंबायोसिस तर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे, ३१/०७/२०२१: सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्स, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ), पुणे व इंटरनॅशनल बिग हिस्टरी असोसिएशनयांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ ते ४ ऑगस्ट, २०२१ दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ‘जग बदलूया: समाज, विज्ञान व महा- इतिहासाच्या जोडणीतून’. (“Changing the World: Community, Science and Engagement with Big History”). हा या परिषदेचा विषय आहे.

या परिषदेत विज्ञानाच्या विविध शाखांचे अभ्यासक (खगोलविज्ञान, पदार्थविज्ञान, भूविज्ञान, जीव विज्ञान, इ.), मानवी विद्याशाखेतील विविध शाखांचे अभ्यासक (इतिहास, समाजविज्ञान, राज्यशास्त्र, पुरातत्त्वविज्ञान, भाषाविज्ञान, इ.), पर्यावरण व सामाजिक क्षेत्रांत विविध देशांत काम करणारे कार्यकर्ते, तसेच वेगवेगळ्या देशांतील औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणव्यवस्थेतील शिक्षक व विद्यार्थी सहभागी होत आहेत.

पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात होणाऱ्या या परिषदेत ३३ अभ्यास सत्रे, ३ विशेष व्याख्याने, आणि आंतरराष्ट्रीय कलाविष्काराचे एक विशेष सत्र होणार असून, परिषदेसाठी वापरलेल्या खास ऑनलाइन प्लॅटफॉर्म मुळे सहभागींना एकमेकांशी अनौपचारिक चर्चा करणेही शक्य होणार आहे.

बिग हिस्टरी किंवा महा इतिहास ही एक आंतरविद्या अभ्यासशाखा असून यात विश्वाच्या उत्पत्तीच्या अभ्यासापासून वर्तमानातील पृथ्वीवरील विविध घडामोडींचा अन्वयार्थ लावण्यापर्यंत सर्व अभ्यास शाखांचा समावेश होतो. त्यामुळे महा इतिहासाच्या माध्यमातून हे एक अत्यंत विशाल पट असलेले, वैचारिक मेजवानी देणारे विश्वव्यापी संमेलन भरवले जात आहे. अशा प्रकारचे महत्त्वाकांक्षी आयोजन असलेली आणि मानवी ज्ञानाच्या सर्व शाखांना स्पर्श करणारी ही पहिलीच परिषद आहे, आणि ती ऑनलाइन होत असल्याने जगाच्या पाठीवर कोठेही असलेल्या सर्वांना यात सहभागी होणे सोपे व अल्प खर्चाचे आहे. जगभरातून सहभाग असल्याने दिनांक १ ते ४ ऑगस्ट या कालावधीत दिवसरात्र या परिषदेचे कामकाज चालेल, व सर्व सत्रांची रेकॉर्डिंग्ज सहभागींना उपलब्ध होतील. अभ्यासकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.