जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

पुणे, 9/12/2021 : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार ११ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लोकअदालतीमध्ये पुणे येथील ५३ हजार प्रलंबित प्रकरणे आणि दाखलपूर्व ९० हजार ५०० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ई-चलनाद्वारे तडजोडीची व दंडाची रक्कम भरून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २५ नोव्हेंबर २०२१ रोजी दाखल नियमित प्रकरण ८ हजार ९६३ तसेच दाखलपूर्व एकूण ३ लाख ८ हजार ८७३ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली होती. राष्ट्रीय अदालतीसाठी ८ लाख गाडी मालकांना ई-चलनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यांच्यावर २५ लाखांची अनपेड चलन आहेत. नोटीसधारकांनी आपल्याला नोटीस मिळाल्यानंतर लोक न्यायालयाची वाट न बघता नोटीसीमध्ये दिलेल्या लिंकवर रक्कम भरवी. लोक न्यायालयातदेखील वादपूर्व ई-चलनच्या नमूद रक्कमेमध्ये कुठलीही सूट दिली जाणार नाही.

मागेच गाडीची विक्री केली केली असूनदेखील ई-चलनाची नोटीस प्राप्त झाल्याच्या तक्रारी आहेत. गाडी विकल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून मोबाईल नंबरदेखील बदलणे गरजेचे असते. परंतू त्याकडे दुर्लक्ष केल्याने नोटीस नोंदणी असलेल्या क्रमांकावर काढली जाते. अशा तक्रारी असल्यास एम-परिवहन ॲप डाउनलोड करावे अथवा https://mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मोबाईल क्रमांक बदलून घ्यावा.

आपली प्रलंबित प्रकरण सामंजस्याने व नागरिकांत तडजोडीने आपसात मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालयाचे सचिव प्रताप सांवत यांनी केले आहे.