लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडर लेफ्ट.जनरल जे एस नैन यांनी लष्करातर्फे पुण्यात कार्यान्वित होत असलेल्या कोविड रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला

पुणे – 27 एप्रिल 2021: पुणे येथे फक्त कोविड रुग्णांच्या उपचारासाठी स्थापन केलेल्या समर्पित वैद्यकीय केंद्रातील सुविधांचा आढावा घेण्यासाठी लष्कराच्या दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन चीफ लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी 27 एप्रिलला जुन्या कमांड हॉस्पिटल संकुलाला भेट दिली.पुण्याच्या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पाठविण्यात आलेल्या नागरी रुग्णांवरील  उपचारासाठी जुन्या कमांड रुग्णालयात मोठ्या क्षमतेने सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या भेटीदरम्यान  लेफ़्ट. जनरल नैन यांनी त्या रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि महामारीविरोधात सुरु असलेल्या लढ्यात ते करीत असलेल्या समर्पित देशसेवेबद्दल त्यांचे कौतुक केले. लेफ़्ट जनरल नैन म्हणाले की, “राज्य सरकार आणि पुण्यातील नागरिक यांना या सुविधा केंद्रांमध्ये  वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आम्ही संपूर्णपणे सज्ज आहोत. कोविड बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी या रुग्णालयात डॉक्टर्स आणि वैद्यकीय सहाय्यकांचे समर्पित पथक तैनात करण्यात आले आहे.”

भारतात गेल्या काही काळात कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यामुळे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी लष्कराच्या पुणेस्थित दक्षिण कमांडने पुन्हा एकदा पुढे येत महाराष्ट्र आणि इतर राज्य सरकारांना  मदत देऊ केली आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद येथे  900 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तसेच राजस्थानमध्ये बारमेर येथे 100 खाटांचे विलगीकरण केंद्र उभारण्यासाठी लष्कराने याआधीच मदत पुरविली आहे. मध्य प्रदेशात देखील विविध ठिकाणी लष्कराने अशाच प्रकारचे मदतकार्य करून भोपाळ येथे 100 खाटांचे वैद्यकीय सुविधा केंद्र तसेच ग्वाल्हेर आणि सागर या ठिकाणी प्रत्येकी 40 खाटांची दोन वैद्यकीय केंद्रे उभारली आहेत. त्याचसोबत, दक्षिणेकडील सर्व राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या केंद्रांच्या उभारणीसाठी क्षमता बांधणी आणि त्या कामाचे सातत्याने परीक्षण करण्याचे काम सुरु आहे. या महामारीदरम्यान सर्व  निवृत्त अधिकारी आणि माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांशी संपर्क साधण्याच्या लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांच्या आणखी एका उपक्रमामुळे दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांमध्ये विश्वास आणि सुकरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैद्यकीय मदतीमध्ये समन्वय साधण्यासाठी तयार केलेल्या विशेष  गटातील एका  वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, दक्षिण कमांडने त्याच्या जबाबदारी क्षेत्रात येणाऱ्या 11 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध मानवतावादी मदतकार्याशी आणि आपत्ती निवारण कार्याशी   जोडून घेतले आहे. विविध आकस्मिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज राहतानाच, गरजू नागरिकांना कोविड संबंधी योग्य वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी सदैव तयार राहण्याचे स्पष्ट आदेश दक्षिण कमांडच्या लष्कर कमांडरांनी या कमांडच्या अधिपत्याखाली असणाऱ्या वैद्यकीय केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या संबंधितांना दिले आहेत.