महाराजाकडून अनैतिक संबंधातून एकाचा खून, मृतदेह कात्रज घाटात टाकला : अपघाताचा केला बनाव

पुणे, ४/०७/२०२१ -वाल्हेकरवाडी मठाधिपती असलेल्या महाराजाने अनैतिक संबंधातून एकाचा खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कात्रज घाटात टाकून अपघाताचा बनाव केला. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करत महाराजाचा कट उघडकीस आणून महाराजासह चौघांना अटक केली.याप्रकरणी महाराज रमेश कुंभार आणी मठात काम करणारे निलेश निकम, अशोक बडगाम आणी आनंद यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.

आनंद गुजर (44,रा.आकुर्डी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सकाळी नागरिकांनी फोन करुन कात्रज नव्या घाटातील हॉटेल मराठी शाही समोर एक व्यक्ती बेवारस अवस्थेत मृत पडल्याची खबर दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, संबंधीत मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. दरम्यान मृतदेहाजवळ एक ज्युपिटर दुचाकी पोलिसांना आढळली. तीचा नंबर तपासला असता, तो बनावट आढळला. यानंतर पोलिसांनी चॅसी नंबरवरुन गाडी मालकाचा शोध लावला. ही गाडी आनंद गुजर याची असल्याचे उघड झाले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला.
 पोलिसांनी केलेल्या तपासात गुजर याची पत्नी मागील सहा महिण्यापासून महाराजांच्या मठात रहात होती. यावरुन गुजर हा शुक्रवारी सायंकाळी मठामध्ये गेला. तेथे त्याची पत्नी व महाराजांबरोबर भांडणे झाली. या भांडणात महाराज, पत्नी व महाराजांच्या सेवेकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आनंद याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट महाराजाने आखला. त्याचा मृतदेह ब्रीझा गाडीमध्ये टाकण्यात आला. तर तो आलेल्या ज्युपिटर स्कुटरचा नंबर बदलून तीही ब्रीझा पाठोपाठ एक भक्त घेऊन आला. त्यांनी आंनदचा मृतदेह कात्रज नव्या घाटातील मराठे शाही हॉटेलसमोर टाकला. त्याच्या शेजारीच स्कुटर ठेवण्यात आली.जेणेकरुन त्याचा वाहनाने उडवल्याने मृत्यू झाल्याचा भास होईल.
आनंद गुजर याच्या पत्नीच्या नावावर आयडीया कंपनीची एजंन्सी आहे. तीने महाराजांना एक ब्रीझा कारही भेट दिली आहे. तर आनंद गुजर सध्या कोणताही कामधंदा करत नव्हता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर काही तासातच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर व तपास पथकाचे नितीन शिंदे यांनी केली.