पोलीस शिपायांना उपनिरीक्षकापर्यंत मजल मारता येणार-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, २/७/२०२१- पोलीस दलात भरती झाल्यानंतर अनेकांना वर्षानुवर्ष सेवा करूनही अधिकारीपदापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे शिपायांना किमान पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, त्यानंतर चार ते पाच वर्ष उपनिरीक्षक म्हणून कामाची संधी मिळावी, यासाठी पृस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशनानंतर लवकरच मंत्रालयात बैठक घेउन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पेटृोलपंप उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, पोलिस दलात 30 वर्ष सेवा करूनही अनेकांना तीन पदोन्नती होउन सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त व्हावे लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिपाई म्हणून रुजू झालेल्यांना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे. त्यानंतर त्यांना अधिकारी म्हणून किमान पाच वर्ष काम करण्याची संधी मिळावी. याहेतूने गृहविभागाकडून शासनाकडे पृस्ताव पाठविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेउन निर्णय लवकर घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक पोलिस शिपायांना अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, कोरोना संसर्गातही पोलीस दलातील कर्मचार्‍यासह अधिकार्‍यांकडून उल्लेखनीय काम केले जात आहे. आव्हानात्मक स्थितीत काम करावे लागत आहे. मात्र, तरीही पोलीस रस्त्यावर उतरून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.