वर्षा पर्यटनासाठी एमटीडीसी’तर्फे विशेष सवलती; सुरक्षित पर्यटनाचे नागरिकांना आवाहन

पुणे, २१ जुलै २०२२ : आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली धुक्याची दुलई, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे, शुभ्र खळखळत फेसाळणारे झरे, निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल, आल्हाददायक गुलाबी थंडी असे नयनरम्य वातावरण अनुभवायचे असेल, तर वर्षा पर्यटनाला जावेच लागते.

नागरिकांना वर्षापर्यटनाचा सुरक्षित आणि आरामदायी अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यात विविध ठिकाणी पर्यटकांसाठी विशेष सोयी – सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

याबाबत माहिती देताना मंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले,” महामंडळाची पर्यटक निवासे निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेची ठिकाणे तसेच जागतिक वारसा स्थळांच्या जवळ आहेत. औरंगाबाद विभागातील अजंठा येथे अजंठा टी पॉईंट आणि फर्दापुर, लोणार येथील पर्यटक निवास आणि लवकरच पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असलेले पर्यटक निवास वेरूळ ही पर्यटक निवासे निसर्गरम्य परिसरात आहेत. त्याचबरोबर नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हीरहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. पर्यटकांच्या आरामदायी वास्तव्याची आणि चवादर भोजनाची सोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये करण्यात येते.”

 

पर्यटक निवासांच्या ठिकाणी प्री-वेडींग फोटोशुट, डेस्टिनेशन वेडींग, कंपन्यांच्या कॉन्फरन्स यासाठी महामंडळाकडुन सोय करण्यात येणार आहे.जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्‍यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 15/20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी “कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट”चीही सुरवात केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत. महामंडळाकडुन देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत पर्यटक निवासाच्या बुकिंगच्या अधिक माहीतीसाठी महामंडळाच्या www.mtdc.co या वेब साईटवर संपर्क साधावा, असे आवाहन हरणे यांनी केले आहे.